Advertisement

आंबेडकर स्मारक रखडलं; निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने पुनर्निविदा


आंबेडकर स्मारक रखडलं; निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने पुनर्निविदा
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रकल्पाचं भूमिपूजन मोठ्या थाटामाटात करण्यात आलं. पण दोन वर्षे उलटली तरी या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात झालेली नाही. हा प्रकल्प रखडला असून पुढील काही महिने तरी या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात होईल अशी चिन्हे नाहीत. कारण आंबेडकर स्मारकासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)कडून काढण्यात आलेल्या निविदेला केवळ एकाच कंपनीकडून प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे याआधीची निविदा रद्द करत स्मारकासाठी पुनर्निविदा मागवण्याची नामुष्की 'एमएमआरडीए'वर आली आहे.


डिझाईन तयार

दादर, चैत्यभूमीजवळील इंदू मिलच्या साडेबारा एकर जागेवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्यदिव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार स्मारकाच्या उभारणीची जबाबदारी 'एमएमआरडीए'वर टाकण्यात आली असून 'एमएमआरडीए'ने आर्किटेक्ट शशी प्रभू यांच्याकडून स्मारकाचं डिझाईन याआधीच तयार करून घेतलं आहे.


एकाच कंपनीकडून प्रतिसाद

या डिझाईननुसार स्मारकाचं बांधकाम करण्यासाठी 'एमएमआरडीए'ने महिन्याभरापूर्वी निविदा मागवल्या होत्या. या निविदांना चांगला प्रतिसाद मिळेल आणि या वर्षभरात स्मारकाच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरूवात होईल, अशी शक्यता होती. आता मात्र ही शक्यता मावळली आहे. कारण या निविदा प्रक्रियेला केवळ शापुरजी-पालनजी या एकमेव कंपनीकडून प्रतिसाद मिळाला आहे.


आधीची निविदा रद्द

नियमानुसार एकच निविदा झाल्याने 'एमएमआरडीए'ने ही निविदा रद्द केली आहे. तर गुरूवारी, २ नोव्हेंबरला स्मारकाच्या बांधकामासाठी नव्याने निविदा मागवल्याची माहिती 'एमएमआरडीए'चे सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली. 


स्मारक बांधण्याची सरकारची इच्छाच नाही!

स्मारकाच्या निविदेला प्रतिसाद न मिळणं ही गंभीर बाब आहेच. पण त्याचवेळी हे स्मारक उभारताना आंबेडकरी जनतेला विश्वासात घेतले जात नसल्यावर आमचा मुख्य आक्षेप आहे. त्यामुळेच स्मारक बांधण्याची सरकारची इच्छाच आहे कि नाही हाच मूळ प्रश्न आहे. सरकारच्या या उदासीन धोरणामुळेच स्मारकाचं काम रखडलं आहे. त्यामुळे आता आम्ही लवकरच याप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत स्मारकाच्या कामाला वेग देण्याची मागणी करणार आहोत.

- आनंदराज आंबेडकर, अध्यक्ष, रिपब्लिकन सेना


निविदा प्रक्रियाच लांबल्याने आता स्मारक प्रकल्प मार्गी लागण्यास विलंब होणार आहे. यानंतर तरी स्मारकाच्या निविदेला प्रतिसाद मिळतो का? याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.



हेही वाचा-

डाॅ. आंबेडकर स्मारकाचे काम दोन महिन्यांत सुरू करा - बडोले


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा