Advertisement

आंबेडकर स्मारकासाठी पुन्हा आली एकच निविदा!


आंबेडकर स्मारकासाठी पुन्हा आली एकच निविदा!
SHARES

दादरच्या चैत्यभूमीजवळील इंदू मिलच्या साडेबारा एकर जागेवर बांधण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या प्रकल्पासाठी नुकत्याच पुनर्निविदा काढण्यात आल्या होत्या. या पुनर्निविदेलाही कंपन्यांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. याआधी ज्या कंपनीने निविदा सादर केली होती, त्याच शापुरजी-पालनजी कंपनीने पुन्हा निविदा सादर केली आहे. दुसऱ्यांदा एकच निविदा आल्याने पुढे काय? ही निविदा प्रक्रियाही रद्द करणार की याच कंपनीला पात्र ठरवत कंत्राट देणार? हाच प्रश्न आता निर्माण झाला आहे.


स्मारकाचे फक्त डिझाईन तयार

इंदू मिलवरील आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी झाले. पण अजूनही या प्रकल्पाची एकही वीट रचली गेलेली नाही. आर्किटेक्ट शशी प्रभू यांनी तयार केलेले स्मारकाचे डिझाईन वगळले, तर अजून प्रकल्पाचे कोणतेही काम मार्गी लागलेले नाही. अशातच हा प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)ने काही दिवसांपूर्वी बांधकामासाठी निविदा मागवल्या. पण निविदेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. शापुरजी-पालनजी या एकमेव कंपनीकडून निविदा सादर झाली.

नियमानुसार दोनपेक्षा अधिक निविदा न आल्यास निविदा प्रक्रिया रद्द करत नव्याने निविदा मागवाव्या लागतात. त्यानुसार एमएमआरडीएने आधीची निविदा रद्द करत 2 नोव्हेंबरला नव्याने निविदा मागवली. यावेळी कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, असा दावा एमएमआरडीएकडून केला जात होता. पण गुरुवारी प्रत्यक्षात तांत्रिक निविदा खुली करण्यात आली, तेव्हा मात्र एमएमआरडीएचा हा दावा साफ फोल ठरला.


दुसऱ्यांदाही आली त्याच कंपनीची निविदा

शापुरजी-पालनजी कंपनीनेच दुसऱ्यांदाही निविदा सादर केली आहे. नियमानुसार दुसऱ्यांदाही एकच निविदा सादर झाली, तर त्या त्याच कंपनीला कंत्राट देता येते किंवा पुन्हा नव्याने निविदा मागवता येतात. त्यामुळे आता एमएमआरडीए शापुरजी-पालनजीला कंत्राट देते, की पुन्हा नव्याने निविदा मागवते याकडेच सर्वांचे लक्ष आहे.


अंतिम निर्णय सरकारी समितीचा

दरम्यान, यासंबंधीचा अंतिम निर्णय स्मारकासाठी स्थापन करण्यात आलेली राज्य सरकारची विशेष समिती घेईल, अशी माहिती एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी दिली आहे.



हेही वाचा

डाॅ. आंबेडकर स्मारकाचे काम दोन महिन्यांत सुरू करा - बडोले


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा