पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर? ही निव्वळ अफवा- चंद्रकांत पाटील

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरील स्टेटस बदलताच त्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. परंतु मुंडे पक्ष सोडून कुठेही जाणार नसून त्या आजही भाजपातच आहेत आणि यापुढंही भाजपातच असतील, असा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साेमवारी केला.

पुढील राजकीय वाटचाल काय असेल? कोणत्या मार्गाने जायचं हे १२ डिसेंबरला सांगणार अशी पोस्ट पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर टाकली. तसंच त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून भाजपचं नाव काढून टाकल्याने मुंडे भाजप सोडणार अशा चर्चा रंगायला लागल्या. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील आपल्या पत्रकार परिषदेत नाराज पंकजा मुंडे भाजप सोडणार अशी अप्रत्यक्ष बातमी माध्यमांना पुरवली. 

हेही वाचा- सत्ता गेल्याने फडणवीसांनी ४० हजार कोटीचा निधी केंद्राला परत पाठवला

त्यावर खुलासा करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. पंकजा मुंडे या नाराज असून त्या भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश करणार या निव्वळ अफवा असल्याचं पाटील म्हणाले. आम्ही त्यांच्याशी बोललो आहोत. त्यांनी कार्यकर्त्यांना संदेश देण्यासाठी तशी पोस्ट लिहिली आहे. त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांचं भाजपच्या वाढीत मोठं योगदान आहे. त्यांच्याच तालमीत त्या वाढल्या आहेत. त्या आजही भाजपात असून त्यापुढंही त्या भाजपातच राहतील, असंही पाटील यांनी सांगितलं. 

पंकजा यांच्या मामेबहीण व खासदार पूनम महाजन यांनीही या वृत्ताचं खंडन केलं आहे. 'पंकजा पराभवामुळं व्यथित आहेत. पण त्या पक्ष सोडणार नाहीत. मी स्वत: पराभव पाहिला आहे. त्यामुळं मी त्यांची स्थिती समजू शकते,' असंही महाजन म्हणाल्या.

परळी मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढणाऱ्या पंकजा मुंडे यांचा त्यांचेच चुलत बंधू राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता. १२ डिसेंबरला भाजपचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिन असून या दिवशी आपल्या पुढील वाटचालीबद्दल निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


हेही वाचा-

काँग्रेसचे नाना पटोले बनले विधानसभा अध्यक्ष

मेट्रो कारशेडला स्थगिती देण्याचा निर्णय दुर्दैवी, फडणवीसांची टीका


पुढील बातमी
इतर बातम्या