अजित पवार होम क्वारंटाईन, कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह की निगेटिव्ह?

कोरोनाच्या संकटकाळात जनतेला दिलासा देण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार गुरूवार २२ आॅक्टोबर रोजी थकवा जाणवत असल्याने होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला की निगेटिव्ह याबाबत अधिकृतरित्या कळू शकलेलं नाही.

परतीच्या पावसाने राज्यात ठिकठिकाणी शेतीचं मोठं नुकसान केलं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी त्यांनी पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचा नुकताच दौरा केला होता. या दौऱ्याहून घरी आल्यानंतर त्यांना ताप आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करून घेतली. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला की पाॅझिटिव्ह याबाबत अधिकृतरित्या कळू शकलेलं नाही. परंतु, थकवा जाणवत असल्याने त्यांनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याचंही म्हटलं जात आहे. परंतु त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी या अफवांचं खंडन केलं आहे.-

हेही वाचा- सरकारी आरोग्य योजनेचा लाभ न देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा- अजित पवार

या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व नियोजित कार्यक्रम व बैठका रद्द केल्या आहेत. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी अजित पवार पक्ष कार्यालयात होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहू शकत नाहीत, असं सांगितंल होतं. राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय @AjitPawarSpeaks हे काही अपरिहार्य कारणास्तव गुरूवार, २२ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपलब्ध राहू शकणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी. अशी सूचना सगळ्यांना देण्यात आली होती. 

तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये पक्षाच्या आमदारांची बैठक होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अजित पवार या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं समजत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून अजित पवार अविश्रांत कार्यरत होते. उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद अशी दुहेरी जबाबदारी सांभाळताना मंत्रायलात ते विविध बैठकांना उपस्थित राहात होते. शिवाय पालकमंत्री म्हणून आपल्या जिल्ह्यातील जनतेला दिलासा देण्याचंही काम करत होते. तूर्तास त्यांनी विश्रांती घेण्याचं ठरवलं आहे.

हेही वाचा- शरद पवार-अजित पवार यांच्या क्लिन चीटविरोधात ईडी न्यायालयात

पुढील बातमी
इतर बातम्या