Advertisement

सरकारी आरोग्य योजनेचा लाभ न देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा- अजित पवार

महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा, असे निर्देश अजित पवार यांनी दिले.

सरकारी आरोग्य योजनेचा लाभ न देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा- अजित पवार
SHARES

खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्ण दाखल झाल्यानंतर काही रुग्णालये त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे अशा रुग्णालयावर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसंच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा दुसरा टप्पा प्रभावीपणे राबवून कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. (maharashtra deputy cm ajit pawar reacts on government health insurance for covid 19)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ‘कोविड-१९’ विषाणू प्रादुर्भाव निमूर्लन आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जिल्ह्यातील काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या पॅनलवर आहेत. तरीही ही रुग्णालये पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा रुग्णालयांवर कार्यवाही करण्यात यावी. केंद्रीय पथकाच्या इशाऱ्यानुसार कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासनाने सतर्क राहून कोरोना विषाणूचा संक्रमण होणार नाही या अनुषंगाने नियोजन करावं.

हेही वाचा - “अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट”

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही  राज्यव्यापी मोहीम हाती घेतलेली आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने अधिक प्रभावीपणे राबवावा. मृत्यूदर कमी करण्याबाबत सूक्ष्म नियोजन करुन मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न करावे, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणाकाळात नागरिक घराबाहेर पडल्यास कोरोना विषाणूचे संसर्ग वाढण्याची शक्यता विचारात घेवून प्रशासनाने सतर्क राहून कामकाज करावं, अशा सूचना अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केलं. लोकप्रतिनिधींना नॉन-कोविड रुग्णालयातील खाटांबाबतची माहिती उपलब्ध करुन द्यावी, स्थानिक आकाशवाणी केंद्र तसंच समाज माध्यमातून मास्क वापरण्याबाबत जनजागृती करावी, सणाच्या काळात नागरिकांना उत्कृष्ट दर्जाचे गहू, तांदूळ, साखर, शेंगदाणे  इत्यादी जीवनावश्यक वस्तू  रास्त दरात मिळण्यासाठी नियोजन करावं, अशा सूचना प्रशासनाला केल्या.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा