अनिल गोटेंच्या गोडाऊनमध्ये दडलंय काय?

सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार याच्या विरोधातील पुराव्याचा फक्त शोरुममधला माल दिला आहे, गोडाऊन अजून बाकी आहे, असा गर्भित इशारा भारतीय जनता पार्टीचे आमदार अनिल गोटे यांनी बुधवारी दिला. मोपलवार यांच्या विरोधात 7 जानेवारी 2017 ला तक्रार दिली होती. मात्र कारवाईला उशीर का लागला? हे मात्र कळू शकले नसल्याचे गोटे यावेळी म्हणाले. त्यांच्या 800 कोटींच्या संपत्तीचा हिशोब पंतप्रधान कार्यालयात दिल्याचंही गोटे यावेळी म्हणाले.

तेलगी प्रकरणातही मोपलवार -

'कोट्यवधी रुपयांच्या स्टॅम्प पेपर घोटाळा प्रकरणाशी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार निगडित होते. मोपलवारचा मला गुंतवण्याचा डाव होता. सध्या मी बेलवर बाहेर आहे' असा आरोपही त्यांनी केला. मोपलवारांची पार्श्वभूमी दिल्ली ते गल्लीतील नेत्यांना माहीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाची जबाबदारी मोपलवार या वादग्रस्त अधिकाऱ्यावर का देण्यात आली? असा प्रश्न उपस्थित केला जात असल्याचं ते यावेळी म्हणाले.

एक तोट्यात असलेली कंपनी 7 आयएएस अधिकाऱ्यांनी विकत घेतली. या कंपनीला वर्षभरात फायदा झाला. काही अधिकाऱ्यांनी हे पैसे समृद्धीमध्ये गुंतवले आहेत. त्यांच्याकडे एवढे पैसे आले कुठून? याची चौकशी केली पाहिजे, असे गोटे म्हणाले. हे सगळं कायदेशीर जबाबदारी स्वीकारून बोलत असल्याचंही ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी त्याचवेळी मोपलवार याला शिक्षा दिली असती, तर ही वेळ आली नसती. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी मोपलवार याला वाचवले. काँग्रेस राष्ट्रीवादी सरकारमध्ये मोपलवारने खूप अवैध पैसा कमावला, असे यावेळी बोलताना अनिल गोटे म्हणाले.


हेही वाचा - 

लोकायुक्तांमार्फत मेहतांची चौकशी होणार - मुख्यमंत्री

घोटाळ्यामुळेच माहिती लपवली जातेय - एकनाथ खडसे

पुढील बातमी
इतर बातम्या