४० टक्के मुंबईकर स्वबळावर कोरोनामुक्त झाले, तर तुम्ही काय केलं? शेलारांचा महापालिकेला सवाल

नीती आयोग आणि मुंबई महापालिकेच्या ३ वाॅर्डातील अँटीबॉडी सर्वेक्षणात झोपडपट्टीत ५७% तर इमारतीमध्ये १६% जणांना कोरोना होऊन गेल्याचं उघड झालं आहे. तर खाजगी लॅबच्या सर्वेत सुमारे २५% लोकांना कोरोना होऊन गेलाय? म्हणजे ४०% मुंबईकर स्वबळावर कोरोनामुक्त झाले? यात तुम्ही काय करुन दाखवलं? असा प्रश्न भाजपन नेते आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला केला आहे. सगळ्याच संकटात मुंबईकरांचे जे स्पिरीट दिसतं तेच कोरोनामध्ये दिसलं. उगाच पालिका आणि सरकारने आम्ही करुन दाखवलेचा दावा करु नये, असंही शेलार म्हणाले. (bjp mla ashish shelar questioned on covid 19 antibody test done by bmc in mumbai)

झोपडपट्टीत शौचालयांची स्वच्छता नसल्याने, इमारतीमध्ये जंतूनाशक फवारणी बंद केल्याने कोरोना वाढला. चाचण्यांची संख्या जेव्हा आवश्यक होती तेव्हा वाढवली नाही. आता चाचण्या वाढवून कोरोना होऊन गेला सांगताय..? यात तुम्ही काय करुन दाखवलं? १ लाख अँटीबॉडी चाचण्या करा. तेव्हा सत्य समोर येईल, असं आव्हान देखील आशिष शेलार यांनी महापालिकेला दिलं.

हेही वाचा - आश्चर्य! ५७ टक्के झोपडपट्टीवासियांची प्रतिकारशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात

यासंदर्भात बोलताना आशिष शेलार म्हणाले, नीती आयोग आणि मुंबई महापालिकेने मुंबईतल्या वाॅर्डामध्ये अँटीबाॅडी टेस्ट केल्यावर सत्य समोर आलं की ५७ टक्के झोपडपट्ट्यांमध्ये आणि १६ टक्के इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये आपोआपच अँटीबाॅडी विकसित झाल्या. एका खासगी लॅबचा रिपोर्ट सांगतो, जवळपास २५ टक्के रहिवाशांच्या शरीरात स्वत:हून अँटीबाॅडी विकसित झाल्या. सर्वसाधारणपणे बघितलं तर मुंबईतील ४० टक्के रहिवाशांमध्ये ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, त्यांच्या शरीरात स्वत:हून अँटीबाॅडी विकसित झाल्या. अशा स्थितीत राज्य सरकार आणि महापालिका करून दाखवल्याचा जो दावा करत आहेत, ते नेमकं काय करून दाखवलं? असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला.

झोपडपट्ट्यांतील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता आणि सॅनिटायझेशन केलं नाही. इमारतींचं सॅनिटायझेशन बंद केलं. १ लाख लोकांची अँटीबाॅडी टेस्ट करा, अशी आम्ही मागणी करूनही ती केली जात नाही. हे यश नागरिकांचं आहे, ते महापालिकेने स्वत:चं मानू नये हेच आमचं म्हणणं आहे, असं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं. 

निती आयोग, मुंबई महानगरपालिका, टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर) यांच्यावतीने आर उत्तर (दहिसर), एम पश्चिम (चेंबूर)आणि एफ उत्तर (माटुंगा) या भागांत जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये ६ हजार ९३६ लोकांचा

सेरो सर्व्हे केला. या सर्व्हेमध्ये झोपडपट्टीतील  ४ हजार लोकांचे तर बिगर झोपडपट्टी भागांतील  ३००० रहिवाशांचे नमुने घेण्यात आले होते. त्यातील झोपडपट्टीतील ५७ टक्के तर बिगरझोपडपट्टी भागांतील १६ टक्के रहिवाशांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्याचं दिसून आलं. म्हणजेच इतके रहिवाशी कोरोना मुक्त झाले असून, यांच्यातील बहुतांश जणांना कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. तर काही जणांना सौम्य लक्षणे होती.

हेही वाचा - राज्यात १८९८ पोलिस कोरोना बाधित, ९८ जणांचा आतापर्यंत मृत्यू
पुढील बातमी
इतर बातम्या