पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: मुख्यमंत्र्यांची मूक संमती?, भाजपचा सवाल

आतापर्यंत अदृष्य असलेले वनमंत्री संजय राठोड दृष्य स्वरूपात दिसले आहेत, तेव्हा अदृष्यपणे सुरू केलेली चौकशी, सर्वांना दिसणार आहे का? असा सवाल भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना केला आहे. 

पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणानंतर जवळपास १५ दिवस अज्ञातवासात राहिलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड (sanjay rathod) मंगळवारी वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी इथं सर्वांसमोर आले. त्यानंतर त्यांनी या आत्महत्या प्रकरणाशी आपला कुठलाही संबंध नसून आपलं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी विरोधकांकडून आरोप केले जात असल्याचा दावा केला. मात्र यावेळी त्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीमुळे कोरोनासंबंधीत नियमांचं उल्लंघन झाल्याने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी देखील विरोधकांनी उचलून धरली आहे. त्यातच राठोड मंत्रीमंडळ बैठकीत उपस्थित राहण्यासाठी मुंबईत आल्याने विरोधकांच्या आरोपांना धार चढली आहे.

हेही वाचा- “कोणी आपलंही का असेना….मुख्यमंत्री त्यांना सोडणार नाही”- संजय राऊत

त्यातच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना देखील लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले, चौकशीनंतर बोलू असं मुख्यमंत्री म्हणत असतील तर आमचा त्यांना थेट सवाल आहे की चौकशी कुठल्या गुन्ह्याअंतर्गत केली जातेय हे स्पष्ट करावं, या गुन्ह्याची नोंद क्राइम रिपोर्ट म्हणून झाली आहे का की न नोंदवलेल्या गुन्ह्यांतर्गत होतेय याची स्पष्टता द्यावी, आतापर्यंत केलेल्या चौकशीत किती लोकांचे जबाब नोंदवलेत त्याची स्पष्टता द्यावी, या प्रकरणातील साक्षीदार संरक्षीत आहेत का की सत्तेत बसलेली लोकंच साक्षीदारांना पळवणे आणि धमकावण्याचे प्रकार करत आहेत? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा, अशी मागणी आशिष शेलार (ashish shelar) यांनी केली.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात पूर्णपणे मौन बाळगल्याने त्यांची या प्रकरणाला मूक संमती आहे, असा समज निर्माण होत आहे. उपमुख्यमंत्री थेट त्यांच्याशी बोलताहेत आणि त्यांच्याशी काय बोलताहेत, याचं स्पष्टीकरण देत नाहीत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात लपवाछपवीचा प्रकार सुरू आहे. या प्रकरणात समाजाची ढाल करण्यात येत असली, तरी ती पीडित महिला भगिनीसुद्धा त्याच समाजाची आहे. त्यामुळे या गुन्ह्याच्या चौकशीला दडपण्याचं एक मोठं कटकारस्थान केलं जातंय. पोलीस यंत्रणेवर आतापर्यंत राजकीय दबाव होता, आता पोलीस यंत्रणेवर आम्ही सामाजिक दबावसुद्धा टाकू, हिंमत असेल तर चौकशी करून दाखवा, अशा पद्धतीचा संदेश दिला जातोय.  

(bjp mla ashish shelar slams cm uddhav thackeray overs pooja chavan suicide case and sanjay rathod)

हेही वाचा- पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी संजय राठोडांनी अखेर सोडलं मौन
पुढील बातमी
इतर बातम्या