Advertisement

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी संजय राठोडांनी अखेर सोडलं मौन

पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणानंतर अज्ञातवासात गेलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड अखेर १५ दिवसांनी सर्वांसमोर आले.

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी संजय राठोडांनी अखेर सोडलं मौन
SHARES

पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणानंतर अज्ञातवासात गेलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड अखेर १५ दिवसांनी सर्वांसमोर आले. पोहरादेवीत दर्शनासाठी आल्यानंतर राठोड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपलं मौन सोडलं. तथ्यहिन आरोपांच्या माध्यमातून गेल्या ३० वर्षांपासून माझ्या सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा प्रकार सुरु असल्याचं म्हणत त्यांनी आपली बाजू मांडली.

संजय राठोड पुढं म्हणाले, पुण्यात झालेल्या तरुणीच्या दुर्दैवी मृत्यूचं संपूर्ण बंजारा समाजाला दु:ख झालं असून आम्ही सर्व कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहोत. मात्र त्यावरून मागच्या १० दिवसांपासून ज्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण आणि बदनामीचा प्रयत्न केला जातोय तो अत्यंत दुर्दैवी आहे. प्रसारमाध्यमं, समाजमाध्यमातून जे काही दाखवण्याचा प्रयत्न होतोय त्यात कोणतंही तथ्य नाही. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश पोलिसांना दिलेले आहेत. तेव्हा पोलिसांच्या तपासातून सर्वकाही उघड होईलच, परंतु माझं कुटुंब आणि समाजाची बदनामी करु नका, अशी विनंती यावेळी संजय राठोड यांनी केली. 

हेही वाचा- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: संजय राठोड यांचा राजीनामा?

या प्रकरणामुळे मी लपून बसल्याचा दावा करण्यात येत होता. परंतु मी १४ दिवस नाही, तर १० दिवस घरात होतो. माझ्या कुटुंबाला सांभाळत होतो. तर मुंबईमधील फ्लॅटमधून शासकीय कामकाजदेखील सुरु होतं.

मी मागासवर्गीय कुटुंबातील असून ओबीसीचं नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. मी ४ वेळा निवडून आलो आहे. माझ्या समाजाचं माझ्यावर प्रेम आहे. मी गेल्या ३० वर्षांपासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात सर्वांना सोबत घेऊन काम करत आहे. अनेक कार्यक्रमात अनेक लोकं माझ्यासोबत फोटो काढत असतात. परंतु एका घटनेमुळे मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात येत आहे. जाणीवपूर्वक माझं सामाजिक आणि राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत आहे. तेव्हा चौकशीतून सत्य बाहेर येईल ते बघा, असं संजय राठोड (sanjay rathod) ठामपणे म्हणाले.

स्पोकन इंग्लिश क्लाससाठी भावासोबत पुण्यात राहत असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुण्यातील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणाच्या ११ ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपकडून राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

(shiv sena mla and forest minister sanjay rathod reacts over pooja chavan suicide case allegation)

हेही वाचा- पूजा चव्हाणप्रकरणी पोलिसांवर दबाव? देवेंद्र फडणवीस यांचा संशय


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा