पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणानंतर जवळपास १५दिवस अज्ञातवासात राहिलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड मंगळवारी वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी इथं सर्वांसमोर आले. मात्र यावेळी त्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी ताबडतोब कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी इथं सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत तसंच वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना त्याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत. यामुळे संजय राठोड (sanjay rathod) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
हेही वाचा- पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी संजय राठोडांनी अखेर सोडलं मौन
राज्यातील कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत आढावा घेतला तसंच मुंबई महानगर क्षेत्रातील (mumbai) महानगरपालिका आयुक्तांशी देखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केलं.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, गेले वर्षभर आपण अतिशय संयमाने व निर्धाराने कोविडची (coronavirus) लढाई लढत आहोत. आपले अनेक आरोग्य कर्मचारी, पोलीस तसंच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण काळात सर्व महत्त्वाचे धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले. या काळात मोठमोठी धार्मिक स्थळे देखील नियमांचे पालन करीत होती आणि आता देखील मिशन बिगीन अगेनमध्ये या कार्यपद्धतीचं पालन करणं आपली जबाबदारी आहे.
मी परवाच माझ्या सोशल मीडिया लाइव्हच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे याचसाठी सांगितलं कारण कोरोनाची दुसरी लाट येणं आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. शासन संकटाचा सामना करण्यासाठी तयार आहेच; पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी पण आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावं, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
(maharashtra cm uddhav thackeray directs to action against responsible person for rush in pohradevi during covid19)