भाजपा महामेळावा: शक्तीप्रदर्शन अन् पैशांची उधळपट्टी

भाजपाच्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त बीकेसीत आयोजित महामेळाव्यातून भाजपाने येणारी निवडणूक डोळ्यापुढे ठेवून गुरूवारी दुपारी मोठं शक्तीप्रदर्शन केलं. या मेळाव्याला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांसहित मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि लाखो कार्यकर्ते उपस्थित होते. शक्तीप्रदर्शन करताना भाजपाने कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केल्याचं सर्वसामान्यांच्या नजरेतून सुटलं नाही.

महिन्याभरापासून तयारी

गेल्या महिन्याभरापासून बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावर या महामेळाव्याची तयारी सुरू होती. मुंबईतील भाजपा नेत्यांसह सर्वच प्रमुख मंत्री या तयारीकडे लक्ष ठेवून होते. मुंबई, महाराष्ट्र आणि इतर राज्यातून साडे तीन लाख कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहतील, असा अंदाज बांधून त्यांच्यासाठी खास सोई केल्या जात होत्या.

'असा' केला खर्च

सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसा नसताना भाजपाकडून महामेळाव्यासाठी होत असलेला खर्च पाहून सर्वसामन्यांना घाम फुटत होता. एमएमआरडीएच्या भल्या मोठ्या मैदानावर ७ मंडप उभारण्यात आले होते. तर एक दोन नव्हे तर ३ मंच उभारण्यात आले होते. ५ पार्किंग लाॅट, कार्यकर्त्यांना राहण्यासाठी ५ तंबू, खाण्या-पिण्याची उत्तम सोय यासह अन्यही अनेक सोयी इथं उपलब्ध करून दिल्या होत्या. या खर्चातून भाजपाचा श्रीमंती थाट दिसून आला.

२८ विशेष ट्रेन

महत्त्वाचं म्हणजे राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी २८ विशेष ट्रेन, ३०० बस आणि जीपची व्यवस्थाही भाजपाकडून करण्यात आली होती. या सर्व सोयींसाठी भाजपाने कोट्यवधी रुपयांचा चुराडा केल्याची चर्चा आहे. खासकरून बीकेसी परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी तर वाहतूककोंडीमुळे हैराण होऊन भाजपाच्या काही गाड्याही अडवल्या.

डिजिटलचा गवगवा

एरवी डिजिटल इंडियाच्या बाता मारणाऱ्या भाजपाच्या गप्पा किती पोकळ आहे याचा प्रत्यय तिथं वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांनाही आला. डिजिटल मीडियाला मर्यादीत प्रवेश आणि वायफायची अपुरी सुविधा यामुळे पत्रकारांना नाहक त्रास सहन करावा लागला.

निवडणुका डोळ्यापुढे ठेवून

लोकसभा आणि राज्यातील विधानसभा तोंडावर आल्या आहेत. हे डोळ्यापुढे ठेवून भाजपाने या मेळाव्याद्वारे जोरदार शक्तीप्रदर्शन केलं असं म्हणायला हरकत नाही. शिवसेनेचा दसरा मेळावा आणि मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा रेकाॅर्ड मोडायचा हेच मनात ठेवत हे शक्तीप्रदर्शन करण्यात आल्याची चर्चा यावेळी होती.


हेही वाचा-

भाजपा महामेळाव्यात मुंडे समर्थकांचा महागोंधळ

पश्चिम द्रूतगती महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी


पुढील बातमी
इतर बातम्या