भाजपाच्या महामेळाव्यामुळे पश्चिम द्रूतगती महामार्गावर गुरूवारपासून प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजेपासून सलग ५ ते ६ तास सुरू असलेल्या वाहतूककोंडीमुळे आॅफिसच्या दिशेने निघालेल्या मुंबईकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनाही या वाहतूककोंडीचा त्रास झाल्याने काही रहिवाशांनी बीकेसीत भाजपाच्या गाड्या देखील अडवल्या.
भाजपाच्या ३८ व्या वर्धापन दिनासाठी आयोजित महामेळाव्या उपस्थित राहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते येऊ दाखल झाले. तर काही वाहतूककोंडीमुळे रस्त्यातच अडकले. कार्यकर्त्यांना आणण्यासाठी भाजपाने २८ विशेष ट्रेनची सोय केली होती. या ट्रेन पनवेल, ठाणे, दादर, सीएसटीएम आणि वांद्रे स्थानकात थांबणार होत्या. या विशेष ट्रेन असल्यामुळे या ट्रेनला उशीर झाला. परिणामी ठाणे स्थानकात सकाळी ९ वाजता येणारी पहिली ट्रेन १० वाजता आली.
शिवाय कार्यकर्त्यांना वांद्रे स्टेशन ते बीकेसीतील एमएमआरडीए ग्राऊंडपर्यंत आणण्यासाठी १७० खास बेस्ट बस आरक्षित करण्यात आल्या. यात ५ एसी बसचा ही समावेश आहे. तर ठाणे स्टेशनवरून ७० बस सोडण्यात आल्या आहेत. परिणामी वांद्रे टर्मिनस, वांद्रे रेल्वे स्टेशन ते बीकेसी परिसरात प्रचंड वाहतूककोंडी झाली.
वांद्रे स्टेशनवरून भाजपा कार्यकर्त्यांना बीकेसीत जाण्यासाठी बस मिळते, पण सर्वसामान्य प्रवाशांना मिळत नाही, असं सकाळचं चित्र होतं. यामुळे खवळलेल्या रहिवाशांनी भाजपाच्या काही गाड्या अडवून धरल्या.
गुरूवारी भाजपा कार्यकर्त्यांनी अमित शहा यांच्या स्वागतासाठी सांताक्रूझ विमानतळ ते बीकेसी अशी रॅली काढली हाेती. या रॅलीमुळेही रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. याचा फटका महानायक अमिताभ बच्चन यांनाही बसला. त्यांनी आपल्या ट्विटरद्वारे याबाबत नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा-
भाजपा महामेळाव्यात मुंडे समर्थकांचा महागोंधळ
३८ वर्षांचा झाली भाजपा, बीकेसीत जाेरदार शक्तीप्रदर्शन