भाजपाच्या महामेळाव्यातील व्यासपीठावर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नसल्याने नाराज झालेल्या मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजीला सुरूवात केली. आ. पंकजा मुंडे आणि खा. प्रीतम मुंडे यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न करूनही कार्यकर्ते शांत होत नसल्याने अखेर पोलिसांना मध्यस्ती करावी लागली.
भाजपाच्या ३८ व्या वर्धापनदिनामित्त वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए ग्राऊंडवर महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला भाजपाचे सर्व आमदार, मंत्री उपस्थित राहणार असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते बीकेसीत येऊन दाखल हाेत आहे. या महामेळाव्याला राज्यभरातून किमान ३ लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
आपापल्या नेत्याचं समर्थन करणाऱ्या घोषणाही कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत. त्यातच मैदानात लावण्यात आलेल्या होर्डिंग-बॅनरवर भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांचा फोटो नसल्याने नाराज झालेल्या मुंडे समर्थकांनी नारेबाजी करत प्रचंड गोंधळ घालण्यास सुरूवात केली. गोपीनाथ मुंडे यांच्या योगदानाचा विसर पडल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.
हा गोंधळ थांबत नसल्याचं लक्षात आल्यानंतर आ. पंकजा मुंडे आणि खा. प्रीतम मुंडे यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही कार्यकर्ते शांत होत नसल्याने पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना बाजूला नेलं. या गोंधळामुळे अमित शहा उशीरा येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हेही वाचा-
३८ वर्षांचा झाली भाजपा, बीकेसीत जाेरदार शक्तीप्रदर्शन