मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार- मुख्यमंत्री

मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या मुंबईसह महाराष्ट्र बंददरम्यान राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यापैकी छोटे, किरकोळ गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सह्याद्री अतिथीगृहामधील मराठा आंदोलनातील नेत्यांसोबत बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

गंभीर गुन्हे कायम राहतील

आंदोलनादरम्यान जे मराठा कार्यकर्ते जमावाबरोबर होते आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत अशा तरूणांचं आयुष्य वाया जाणार नाही याची काळजी घेत निरपराध आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जातील. पण पोलिसांवर हल्ला करणाऱ्या, जाळपोळ करून सरकारी मालमत्तेचं नुकसान करणाऱ्य आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतण्यात येणार नाही. कारण सरसकट गुन्हे मागे घेतले, तर राज्यात अराजकता माजेल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

चर्चा गुलदस्त्यातच

मराठा आंदोलक आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सह्याद्री अतिथीगृहातील बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे मुख्यमंत्र्यांनी गुलदस्त्यातच ठेवलं आहे. एवढंच नव्हे, तर या बैठकीला नेमके कोण आंदोलक उपस्थित होते? याबाबतही गुप्तता बाळगण्यात आली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला उपस्थित राहिलेल्या नेत्यांशी आपला संबंध नसल्याचं म्हणत मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख समन्वयकांनी बैठकीची हवाच काढून घेतली आहे.

शांततेचं आवाहन

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार सुरूवातीपासूनच सकारात्मक होतं आणि आताही आहे. कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. त्यामुळं आंदोलकांनी शांततेचं सहकार्य करावं, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

मेगा भरतीत अन्याय नाही

मराठा आक्षरणाबाबत मराठा समाजाच्या सर्व नेत्यांशी, आंदोलकांशी चर्चा सुरू आहेत, तोडगा काढण्याचा प्रयत्न होतो आहे. सध्या भूमिका मांडण्याची गरज होती, म्हणून ती मांडली आहे. तरी यापुढंही नेत्यांशी चर्चा करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे सरकार पदांसाठीच्या मेगा भरतीत मराठा तरूणांवर अऩ्याय होणार नाही अशी शाश्वतीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.


हेही वाचा-

'मुख्यमंत्र्यांनी आता जनतेपुढंच माफी मागावी'

पेड लोक मराठा आंदोलनात शिरले- चंद्रकांत पाटील


पुढील बातमी
इतर बातम्या