तन्मय फडणवीस हा माझा दूरचा नातेवाईक, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याच्या लसीकरणाचा फोटो व्हायरल झाल्यापासून काँग्रेसकडून फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत या लसीकरणात जर नियमांचं उल्लंघन झालं असेल, तर ते अयाेग्य आहे, असं मत व्यक्त केलं.

यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तन्मय फडणवीस हा माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषांप्रमाणे लसीचा डोस देण्यात आला याची मला कल्पना नाही. जर हे लसीकरण नियमानुसार झालं असेल तर त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. परंतु नियमांचं उल्लंघन करु जर झालं असेल तर ते अयोग्य आहे. नियमांनुसार पात्र नसल्याने माझ्या पत्नीला आणि मुलीलाही अजून लस देण्यात आलेली नाही. प्रत्येकाने सरकारने घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं हे माझं ठाम मत आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं.

तन्मय फडणवीस याने नागपूरमधील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ इथं कोरोनावरील लस घेतल्याचा ‘फोटो’ सोमवारी ‘सोशल मीडिया’वर ‘व्हायरल’ झाला. परंतु त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरूवात झाल्याने रात्री ‘इन्स्टाग्राम’वरून हा ‘फोटो’ हटविण्यात आला. मात्र तोपर्यंत अनेकांनी या फोटोचे ‘स्क्रीनशॉट्स’ घेऊन ठेवले होते. यावरून काँग्रेसने फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं. 

हेही वाचा- “अपुनने एकही मारा.. लेकीन सॅालिड मारा..”, केदार शिंदेंनी केलं राज ठाकरेंचं कौतुक

४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातलीय. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? तन्मय फडणवीस ४५ वर्षांपेक्षा मोठा आहे का?, फ्रंटलाईन वर्कर आहे का?, आरोग्य कर्मचारी आहे का ?, जर तसं नसेल, तर त्याला लस दिलीच कशी गेली? भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जीवाची काहीच किंमत नाही का? असा प्रश्न महाराष्ट्र क्राँग्रेसच्या ट्विटरवरून उपस्थित करण्यात आला. 

या वादानंतर तन्मय फडणवीस यानं मुंबईतील सेव्हन हिल्स या रुग्णालयात कोरोनावरील लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यानं कोणत्या निकषांनुसार हा डोस घेतला याची कल्पना नाही. त्यानं आम्हाला प्रमाणपत्र दाखवल्यावर आमच्या सेंटरमध्ये त्यांना दुसरा डोस देण्यात आला, असा खुलासा नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटटचे संचालक शैलेश जोगळेकर यांनी केला.

तन्मय फडणवीस हा माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू असून, तो २५ वर्षांच्या आतील आहे. कोरोना लसीकरणाच्या सध्याच्या कार्यक्रमानुसार केवळ ४५ वर्षांवरील सर्वसामान्य नागरिकांनाच लस घेण्याची मुभा आहे. 

(devendra fadnavis clarifies on tanmay fadnavis covid 19 vaccination)

हेही वाचा- महाराष्ट्रात १५ दिवसांचा कडक लाॅकडाऊन हवाच- छगन भुजबळ

पुढील बातमी
इतर बातम्या