Advertisement

महाराष्ट्रात १५ दिवसांचा कडक लाॅकडाऊन हवाच- छगन भुजबळ

महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या थैमानाला आवर घालायचा असेल तर किमान १५ दिवसांचा कडक लाॅकडाऊन लावलाच पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात १५ दिवसांचा कडक लाॅकडाऊन हवाच- छगन भुजबळ
SHARES

महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या थैमानाला आवर घालायचा असेल तर किमान १५ दिवसांचा कडक लाॅकडाऊन लावलाच पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. 

कोरोनाचं संकट वाढत असताना आज होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील कोरोनाच्या स्थितीवर वृत्तवाहिनीशी बोलताना छगन भुजबळ यांनी सांगितलं की, मंत्रीमंडळ बैठकीत मी पुन्हा एकदा महाराष्ट्रात किमान १५ दिवसांचा कडक लाॅकडाऊन लावण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे.

यामागचं कारण म्हणजे भलेही राज्यात संचारबंदी कलम १४४ लागू करण्यात आलेलं असलं, तरी त्याचा फारसा उपयोग होताना दिसून येत नाहीय. लोकं बिनदिक्कतपणे रस्त्यावर, बाजारपेठा, दुकानं, इतर सार्वजनिक ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. आवश्यक काम नसतानाही पायी किंवा वाहनाने उगीच घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात आपल्याला अपयश येत आहे. 

हेही वाचा- मुंबईतील 'इतके' खासगी केंद्र लसीअभावी बंद

कोरोनाचा संसर्ग एकाकडून दुसऱ्याकडे सहजपणे फैलावत आहे. परिणामी राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने ठिकठिकाणी बेड्स, व्हेंटिलेटर्स, आॅक्सिजन, औषधे कमी पडू लागली आहेत. लोकं शेकडोच्या संख्येने दगावू लागली आहे. हे अत्यंत भयानक चित्र आहे. अशा स्थितीत लोकांचे प्राण वाचवणं यालाच सरकारचं प्राधान्य आहे, असं छगन भुजबळ म्हणाले. 

एकदमच ६ ते ८ महिन्यांचा लाॅकडाऊन नको, त्याऐवजी १५ दिवसांचा जरी कडक लाॅकडाऊन लावला, तरी या वेळेत साधनसामुग्री जमा करण्यासाठी तसंच आरोग्य सेवा उभारण्यासाठी सरकारला वेळ मिळू शकेल. लोकांना देखील फार अडचणींचा सामना करावा लागणार नाही. म्हणूनच किमान १५ दिवसांचा कडक लाॅकडाऊन राज्यात लावण्यात यावा, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांना करणार आहे, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

याआधी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील मुख्यमंत्री कडक लाॅकडाऊनवर येत्या २ दिवसांत निर्णय घेतील, अशी माहिती दिली होती. यामुळे मंत्रीमंडळ बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

(chhagan bhujbal demands strict lockdown in maharashtra)

हेही वाचा- मोठी बातमी! १ मे पासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला मिळणार कोरोना लस


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा