फोडाफोडीचा आरोप करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने माफी मागावी- मुनगंटीवार

भाजपने शिवसेना आमदाराला फोडण्यासाठी ५० कोटी रुपयांची आॅफर दिल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी केला. सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपकडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांना सातत्याने फोनाफोनी सुरू असल्याचा आरोपही दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुराव्याशिवाय आरोप करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने माफी मागावी, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. 

काय म्हणाले मुनगंटीवार?

भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडण्यासाठी फोनाफोनी केली, असा आरोप करणं म्हणजे स्वत:च्याच आमदारांच्या नितीमत्तेवर संशय घेणं आहे. तसं झालं असेल, तर काँग्रेस-राष्ट्रवादीने पुरावे सादर करावेत नाहीतर या आमदारांना निवडून देणाऱ्या जनतेची आणि आमदारांची जाहीर माफी मागावी, असं मुनगंटीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

हेही वाचा- देवेंद्र फडणवीस देणार का मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा ?

विचारांशी बांधील

शिवसेना आमदाराला फोडण्यासाठी भाजपने ५० कोटी रुपयांची आॅफर दिल्याचाही आरोप वडेट्टीवार यांनी केला. त्यावर उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले की, शिवसेनेचे आमदार शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बांधील आहेत. कुणीही कितीही पैशांची खिरापत केली, तरीही ते फुटणारे नाहीत, त्यामुळे या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, असंही ते म्हणाले.

राष्ट्रपती राजवट 

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटी लागू होणार का ? या प्रश्नाचं उत्तर देताना मुनगंटीवार यांनी सांगितलं की, कुणीही सत्ता स्थापनेसाठी दावा केलेला नसताना आणि विद्यमान विधानसभेची मुदत संपलेली असताना काळजीवाहू सरकार अस्तित्वात येऊ शकत नाही. त्यामुळे नियमानुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होते, हे कायद्यात लिहिलेलं आहे. त्यामुळे आम्ही कुणाला राष्ट्रपती राजवटीची भीती घालतोय, असा त्याचा अर्थ कुणीही लावू नये.  

शिवाय जनतेने भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीला बहुमत दिलेलं असल्याने लवकरच महायुतीचंच सरकार स्थापन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेना आपल्या म्हणण्यावर ठाम असल्याने त्यांच्याशी सर्व पातळीवरुन चर्चा सुरू असल्याचंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.


हेही वाचा-

भाजपकडून शिवसेना आमदाराला ५० कोटींची आॅफर, वडेट्टीवार यांचा खळबळजनक आरोप

आमच्या आमदारांना भाजपकडून फोन, काँग्रेस, राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप


पुढील बातमी
इतर बातम्या