Advertisement

देवेंद्र फडणवीस देणार का मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा ?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पदाचा राजीनामा देणार की? हंगामी मुख्यमंत्रीपदावर राहणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

देवेंद्र फडणवीस देणार का मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा ?
SHARES

विधानसभा निवडणुकीत जनतेचा कौल मिळालेल्या भाजप-शिवसेनेपैकी एकाही पक्षाने सत्ता स्थापनेसाठी दावा न केल्याने महाराष्ट्रातील राजकीय पेच अद्याप कायम आहे. त्यातच विद्यमान १३ व्या विधानसभेची मुदत ८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री संपत आहे. त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पदाचा राजीनामा देणार की? हंगामी मुख्यमंत्रीपदावर राहणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदासह सत्तेत निम्मा वाटा या मागण्यांवर शिवसेना अजूनही ठाम आहे. तर निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवलेला भाजपदेखील मुख्यमंत्री पदावरील हक्क सोडण्यास तयार नाही. शिवसेनेशिवाय भाजपला विधानसभेत बहुमताचा (१४५) आकडा गाठणं शक्य नसल्याने त्यांनीही अद्याप राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही शिवसेनेला पाठिंबा देण्याऐवजी विरोधातच बसण्याची भूमिका बोलून दाखवली आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय पेच वाढला आहे. 

हेही वाचा- भाजपकडून शिवसेना आमदाराला ५० कोटींची आॅफर, वडेट्टीवार यांचा खळबळजनक आरोप

शुक्रवार ८ नोव्हेंबर मध्यरात्री विद्यमान विधानसभेचा कालावधी संपत आहे. त्याआधी कुठल्याही पक्षाने सत्तास्थापनेचा दावा न केल्यास राज्यपाल पुढील काही काळासाठी हंगामी सरकार चालवण्यास मुभा देतील असं म्हटलं जात आहे. या काळजीवाहू सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर कायम राहतील की आपला राजीनामा देतील, यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

याआधी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत कधीही ठरलं नव्हतं, असं म्हणत शिवसेनेचा रोष पत्करावा लागलेल्या फडणवीस यांच्याऐवजी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांना महाराष्ट्रात पाठवणार, अशा अफवा रंगल्या होत्या. परंतु आपण केंद्रातच ठिक असून महाराष्ट्रात परतणार नाही. तसंच भाजपचे विधीमंडळ नेते म्हणून फडणवीस यांची निवड झाल्याने तेच पुढचे मुख्यमंत्री होतील, असं म्हणत गडकरी यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

सध्या भाजपाकडे १०५ आमदारांचं संख्याबळ आहे तर शिवसेनेकडे ५६ आमदारांचं संख्याबळ आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५४ आणि काँग्रेसकडे ४४ आमदार आहेत. बहुमतासाठी १४५ आमदारांची गरज असून सत्तेची गणितं कशी सुटतील? याची सर्वचजण आतुरतेने वाट बघत आहेत.   



हेही वाचा-

मी केंद्रातच ठीक, महाराष्ट्रात येण्याचा प्रश्नच नाही- नितीन गडकरी

भाजपा-शिवसेनेत कोणीही मध्यस्थी करण्याची गरज नाही - संजय राऊत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा