फडणवीसांचा ‘वर्षा’तील मुक्काम वाढण्यामागं 'हे' कारण

महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. त्यातच इतक्यात  नवीन सरकार बनण्याची कुठलीही चिन्हे नसल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यातील मुक्काम वाढवला आहे. 

हेही वाचा- उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा लांबणीवर? 'हे' असू शकतं कारण

राज्यात कोणताच पक्ष सरकार स्थापन करू न शकल्याने १२ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागानं एक परिपत्रक जारी करून सर्व मंत्र्यांना १३ नोव्हेंबरपर्यंत मंत्रालयातील कार्यालये रिकामी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बहुतेक सर्वच मंत्र्यांनी एका दिवसाच्या आत मंत्रालयातील आपापली कार्यालये रिकामी केली. 

पण मंत्र्यांचे बंगले अजून रिकामे झालेले नाहीत. काही माजी मंत्र्यांनी मंत्रालयासमोरील बंगले रिकामे करण्याची तयारी सुरू केली आहे. तर मलबार हिल येथील बंगले रिकामे करण्यासाठी काही माजी मंत्र्यांनी अतिरिक्त वेळ मागितली आहे. यांत फडणवीस मात्र निश्चिंत आहेत. 

हेही वाचा- सत्ता स्थापनेबद्दल शिवसेनेला विचारा, शरद पवार यांची गुगली

कारण फडणवीस यांनी वर्षा बंगल्यातील वास्तव्यासाठी ३ महिने मुदतवाढ मिळावी, यासाठी अर्ज केला होता. हा अर्ज मंजूर करण्यात आल्याने फडणवीस यांचा मुक्काम आणखी ३ महिने वर्षात राहणार आहे. मात्र ३ महिन्यांच्या आत राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात येऊन नवीन सरकार सत्तेत आलं, तर नव्या मुख्यमंत्र्यांसाठी फडणवीस यांना बंगला तत्काळ रिकामा करून द्यावा लागणार आहे.  


हेही वाचा-

पाऊस देवेंद्रना घेऊन गेला हेही बरे झाले, राष्ट्रवादीच्या बैठकीत फडणवीसांवर चर्चा

राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम, दिल्लीत शरद पवार घेणार सोनिया गांधींची भेट


पुढील बातमी
इतर बातम्या