नुकसानग्रस्तांसाठी १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर- उद्धव ठाकरे

अतिवृष्टी आणि पूर यामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शेतकरी, सर्वसामान्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारतर्फे १० हजार कोटी रुपयांचं पॅकेज मंजूर करण्यात आलं आहे. यासंबंधीची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवार २३ आॅक्टोबर रोजी केली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदतीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, परिवहनमंत्री अनिल परब, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आपत्ती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि मृद व जलसंधारण मंत्री शंकर गडाख उपस्थित होते. या बैठकीत नुकसानग्रस्तांसाठी १० हजार कोटी रुपयांचं पॅकेज देण्याचं ठरवण्यात आलं. (maharashtra cm uddhav thackeray declared 10 thousand crore rupees financial aid or relief package for flood affected farmers)

हेही वाचा- पायाखालचे दगड का निसटताहेत? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोमणा

आढावा बैठक घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, अतिवृष्टीच्या संकटामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांचं भयानक नुकसान झालं आहे. पिकं वाहून गेली आहेत, जमीन खरडून गेली आहे, रस्त्यांची विल्हेवाट लागली आहे, विहिरी गाळाने भरून गेल्या आहेत, विजेचे खांब उलटे पालटे झाले आहेत. सगळ्यांचा विचार केल्यानंतर आम्ही आढावा घेतला. या आपत्तीच्या निमित्ताने आम्ही शेतकऱ्यांना शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. म्हणून या सगळ्याचा विचार करून १०,००० कोटी रुपये देण्याचं आम्ही निश्चित केलं आहे.

हे १०,००० कोटी रुपये विविध कारणांसाठी असतील. शेतीचं झालेलं नुकसान, वाहून गेलेली शेती, खरडून गेलेली शेती, पिकं वाहून गेली असतील, रस्ते उध्वस्त झाले असतील, विजेचे खांब पडले असतील, दळणवळण यंत्रणा असेल, या सर्व गोष्टींसाठी ₹ १०,००० कोटी आम्ही जाहीर करत आहोत. दिवाळीपर्यंत ही पूर्ण मदत प्रत्येक आपत्तीग्रस्तापर्यंत पोहोचावी, असा आमचा प्रयत्न राहील, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

जिरायत, बागायत जमिनीसाठी प्रति हेक्टर ६,८०० रुपये ही केंद्राची मदत अपुरी आहे. त्यामुळे आम्ही ती दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी १०,००० रुपये इतकी देणार आहोत. फळपिकांसाठी १८,००० रुपये प्रति हेक्टर ऐवजी २५,००० रुपये प्रति हेक्टर (२ हेक्टरच्या मर्यादेत) मदत करण्यात येईल. मृत व्यक्तींच्या वारसांना, मयत पशुधनासाठी, घरपडझडीसाठी वाढीव मदत देण्यात येईल, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा- राज्य सरकारचा नाकर्तेपणा लपवणं एवढंच पवारांचं काम- देवेंद्र फडणवीस
पुढील बातमी
इतर बातम्या