Advertisement

पायाखालचे दगड का निसटताहेत? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोमणा

यशाची शिखरं पादाक्रांत करताना पायाखालचे दगड का निसटताहेत याकडे लक्ष द्या, असा चिमटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला काढला आहे.

पायाखालचे दगड का निसटताहेत? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोमणा
SHARES

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून ते शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना यशाची शिखरं पादाक्रांत करताना पायाखालचे दगड का निसटताहेत याकडे लक्ष द्या, असा चिमटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला काढला आहे. (maharashtra cm uddhav thackeray reacts on eknath khadse resign from bjp)

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, एकनाथ खडसे महाविकास आघाडीत दाखल होत असल्याने त्यांचं स्वागतच आहे. त्यांच्याबद्दल मी जास्त काही बोलण्याची गरज नाही, कारण त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. ते स्पष्टवक्ते आणि लढवय्ये आहेत. भाजप आणि शिवसेनेची युती असताना ज्यांनी भाजपाची पाळंमुळं महाराष्ट्रात रुजवली त्यात गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासोबत एकनाथ खडसे यांचा देखील मोलाचा वाट होता. खडसेंसारखा माणूस ज्यावेळी पक्ष सोडतो तेव्हा भाजपनं याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे. यशाची शिखरं पादाक्रांत करताना पायाखालचे दगड का निसटत आहेत याकडे त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला.

हेही वाचा - राजीनाम्यानंतर खडसेंचा पुन्हा फडणवीसांवर प्रहार…

एकनाथ खडसे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. पक्षाने मला आजपर्यंत भरपूर दिलं. पण मी माझी तक्रार वारंवार बोलून दाखवल्यानंतरही मला न्याय मिळाला नाही. मी इतर कुणावरही नाही, तर केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचं त्यांनी सांगितलं.

पक्षासाठी मी उभं आयुष्य खर्ची घातलं, लोकांचे दगड, धोंडे खाल्ले, कुणी थुंकलं, वाळीत टाकलं अशा अवस्थेतही मी ४० वर्षे पक्ष वाढवण्याचं काम केलं. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यामागे भूखंड घोटाळा प्रकरणात चौकशी लावली, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना कुणीही माझ्या राजीनाम्याची मागणी केलेली नसताना माझ्याकडून राजीनामा घेण्यात आला. माझ्यावर विनयभंगाचा खटला चालवण्यात आला. इतक्या खालच्या थराचं राजकारण झालं, यापेक्षा मरण परवडलं असतं, अशी व्यथा एकनाथ खडसे यांनी मांडली.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा