शेतकरी कर्जमाफीवरून श्रेयवादाचा अंक सुरू

राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावरून शेतकरी कर्जमाफीचे नाट्य संपले असे तुम्हाला वाटले असेल. पण तसे नाहीये. कारण या कर्जमाफीच्या श्रेयवादाचा दुसरा अंक आता सुरू झाला आहे.

भाजपासोबत सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेने या अंकात पहिला प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांच्या लढ्याला यश मिळाल्याचा दावा करणारे पोस्टर्स शिवसेनेने मुंबईमध्ये लावले आहेत. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला शिवसेनेने पाठिंबा दिला होता, असे या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे. आंदोलन सुरू असताना भाजपाने शिवसेनेला फारसे विश्वासात घेतले नव्हते. त्यावरून शिवसेनेने मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कारही टाकला होता. पण भाजपने त्याला फारसे महत्त्व न दिल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी स्थापलेल्या उच्चाधिकार मंत्रिगटात सहभागी व्हावे लागले.

तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांनी देखील या श्रेयवादात उडी घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून श्रेयवादाचे नाट्य काही दिवस महाराष्ट्रातील जनतेला पहायला मिळणार असं चित्र सध्या दिसत आहे.


हेही वाचा - 

राज्यातील शेतकरी संपावर, महाराष्ट्र बंदची हाक

शेतकरी संपावर बोलायचं नाय !

शिवसेनेसोबत काही मुद्द्यांवर मतभेद, तरीही...-राजनाथ सिंह


मंत्रीगट आणि शेतकरी नेते यांच्यामध्ये झालेल्या चर्चतून त्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हित जपत तोडगा काढल्याबद्दल या नेत्यांचे मी अभिनंदन करतो. अडचणीत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना या निर्णयाने निश्चितपणे मोठा दिलासा मिळेल. अल्पभूधारकसह अन्यही घटक यात सहभागी केल्याने सर्व प्रकारच्या गरीब-गरजू शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. मला विश्वास आहे की, या निर्णयाचे निकष ठरवताना समिती गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळतील याची काळजी घेईल. ज्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मदतीची आवश्यकता आहे, त्यांना या योजनेचा फायदा होईल, हे राज्य सरकार सुनिश्चित करेल. शेतकरी आणि त्यांचा विकास, समृद्धी ही राज्य सरकारची सर्वोच्च प्राथमिकता कालही होती, आजही आहे आणि भविष्यात सुद्धा राहील.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

पुढील बातमी
इतर बातम्या