शेतकरी संपावर बोलायचं नाय !

  Mumbai
  शेतकरी संपावर बोलायचं नाय !
  मुंबई  -  

  कृषिप्रधान भारताची आर्थिक राजधानी म्हणवणाऱ्या मुंबईला 1 जून 2017 रोजी एका नव्या संपाला सामोरे जावे लागले. हा संप प्रत्यक्ष मुंबईत घडला नसला तरी त्याची झळ दोन दिवसांनी का होईना पण, मुंबईकरांना परिणामकारकरीत्या जाणवली. आजवर गिरणीसंपापासून अनेक संप पाहणाऱ्या मुंबईकरांना शेतकऱ्यांचा संपाविषयी काहीही पडलेले नाही, असा एक सूर याचदरम्यान सोशल मीडियावर आळवला गेला. विशेषतः मुंबईत येऊन रोजीरोटी मिळवणाऱ्या पण मूळचे शेतकरी असणाऱ्यांकडूनच हा एकसुरी राग गायला गेला. अर्थात, या मूर्खपणाला महत्त्व देण्याची गरज नसली तरी हा समज तद्दन चुकीचा आहे, हे सांगणे महत्त्वाचे ठरते.

  मुंबईतील बहुचर्चित अशा गिरणी कामगारांच्या संपात शेकडो मुंबईकर कामगारांच्या घरांत अनेक दिवस चूल पेटली नव्हती. आज त्याच मुंबईकरांना शेतकरी संपाची जाण नाही, असे अनेक सोशल मीडियातील ट्रोल करणारे बोंबलतात. अर्थात, सोशल मीडियावरील उणी-दुणी काढणाऱ्यांबद्दल जराही आस्था नसली तरी शेतकऱ्यांविषयी प्रत्येक मुंबईकराला आस्था असणे स्वाभाविक आहे. आज मुंबईत राहणाऱ्यांपैकी बहुतांश मुंबईसाठी उपरेच आहेत आणि ते मूळचा कुठल्यातरी गावाकडच्या सातबारावरील शेतकरीच आहेत, हेही लक्षात घ्या.

  सोशल मीडियावर सध्या शेतकऱ्यांकडून होणाऱ्या नासाडीविरोधात काहींनी टीका केली म्हणून अनेकजण चवताळले आहेत. शहरी भागात संडासात फ्लश होणाऱ्या पाण्यापासून शेतमाल शेतातच कवडीमोलाने सडण्यापर्यंतचे युक्तिवाद यावेळी केले गेले. अर्थात, टीका करण्याचा अधिकार दोन्ही बाजूंना असला तरी आता नासाडीचे समर्थन करणारे स्वतः मात्र यापूर्वी भाषणस्वातंत्र्य, आविष्कार स्वातंत्र्याच्या बाता करत होते, हे विसरून कसे चालेल? आता हीच मंडळी टीका ऐकून घेण्याऐवजी वाट्टेल त्या भाषेत एकमेकांचा उद्धार करताना दिसते. त्यामुळे, पुन्हा एकदा नमोभक्त आणि नमोरुग्ण या वादाचीच किनार निर्माण होताना जाणवते. सध्या सोशल मीडियावर कोणत्याही विषयावर याच दोन गटांचे ट्रोलिंग सुरू असते. तिसरा विचार जरी कोणी मांडला तरी एकतर तो मूर्ख ठरतो किंवा अतिशहाणा ! भक्त आणि रुग्णांकडून आपापल्या गटांमध्ये वाटून घेण्याचे कार्य मनःपूर्वक सुरू असते. त्यामुळेच, शेतकऱ्यांचा संपही याच गटांच्या तडाख्यात सापडला आणि शेतकऱ्यांच्या खऱ्या प्रश्नांकडे एकप्रकारे दुर्लक्षच झाले. या संपालाही जातीपातीपासून पक्षीय राजकारणाचे पदर दिले गेले आणि त्यात मुख्यमंत्र्यांपासून पत्रकारांपर्यंत सर्वांचा सहभाग राहिला. तसेच, या सर्व प्रकरणातून एक नवा वाद म्हणण्यापेक्षा नवा भेद निर्माण केला गेला, तो म्हणजे शहरी माणूस (अर्धवट) आणि शेतकरी (बिच्चारा) ! वाढत्या नागरीकरणात शेतजमिनींबरोबरच शेतकरीही शहरी होतो आहे. आज प्रत्येक शहरातील बहुतांश नागरिक हे मूळचे शेतकरीच आहेत, हे दोन्ही बाजूंच्या टीकाकार विसरलेले आहेत.

  शेतजमिनींना सोन्याचा भाव आल्याने अनेक ठिकाणी गुंठा मंत्री निर्माण झाले. आज ते गुंठा मंत्री स्वतःला शेतकरी पण म्हणतात आणि शहरी माणूसही. आता अशा कुंपणावर बसलेल्यांचे सोशल मीडियावरील मत काय, हे मात्र कळत नाही. त्यातील काही शेतकरी म्हणून तर काहीजण शहरी म्हणून पोपटपंची करत आहेत. मुंबईसारख्या शहरात राहणाऱ्यांना जणू शेतीतले काहीच कळत नाही आणि त्यांना याबाबत बोलायचा अधिकारच नाही, असा एक सूर या सर्व चर्चांमध्ये दिसतो. पत्रकारांनाही अगदी तटस्थता विसरून आपली जात, आपले शेतकरीपण वगैरे आठवायला लागले आहे. आजवर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचेही राजकारण झाले. प्रथा-परंपरांची कारणे देत अनेकांनी आत्महत्याच खोट्या ठरवण्यापर्यंतची बोचरी टीका केली होती. अर्थात, अनेक ग्रामीण भागातील पोलिस पंचनाम्यांच्या घटनांमुळे या चर्चांना वावही दिला होता. पण, त्यावेळी आजच्या इतकी खालच्या पातळीची टीका कोणी केली नव्हती. आज सोशल मीडियावर टोकाची शिवीगाळ होण्यापर्यंत मजल जात आहे. त्याबाबत स्त्री-पुरुष समानता राखण्यातही धन्यता मानली जात आहे. म्हणजे, स्त्रियांनाही वाट्टेल त्या भाषेत ट्रोल केले जात आहे, यासारखे दुर्दैव नाही !

  शेतकरी संपावर शहरी लोकांनी बोलायचेच नाही हा तोरा काही बरोबर नाही. शेतकऱ्यांवर टीका करायलाही शेतकरी सर्टिफिकेट लागणार काय ? शेतमालाची नासाडी करणारे दलालांचे हस्तक आहेत, यामागे राजकारण्यांचीच फूस आहे, वगैरे टीका केलीच तर बिघडले कुठे ? जे दूध रस्त्यावर ओतले जात होते त्यामुळे रस्ता निसरडा होऊन एखादा बाईकस्वार शेतकरीच अपघातग्रस्त झाला तर त्याची जबाबदारी कोणाची ? दूध रस्त्यावर ओतण्याऐवजी गरीबांना द्या, असे सुचवले तर चुकले का ? तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा पण नवनवे भेद कशासाठी ? आधीच जातीय वाद, प्रांतीय वाद रुजलेले असताना नवा शेतकरी विरुद्ध शहरी माणूस असा वाद का निर्माण करायचा ? 

  आज मुंबईसह अनेक शहरांत ठिकठिकाणी भरणाऱ्या आठवडी बाजारांना मिळणारा प्रतिसाद पाहता शेतकरी आणि त्यांच्या थेट शेतातून आलेल्या शेतीमालाविषयी शहरी भागातील लोकांना किती आस्था आहे, हे लक्षात येते. दलाल, आडते यांचे नेटवर्क या आठवडी बाजारांना किती विरोध करण्याचा प्रयत्न करते हे त्या बाजारांमध्ये माल आणणाऱ्या शेतकऱ्यांकडूनच समजते. आजच्या या संपात या दलालांचेच पेरलेले भणंग कशावरून नसतील ? शेतकऱ्यांचे वर्षानुवर्षे प्रतिनिधीत्व करणारे तथाकथित शेतकरी नेते विधिमंडळात आजवर झोपा काढत होते ? आज स्वतःला मूळचे शेतकरी म्हणवणारे पत्रकार, सरकारी कर्मचारी आदींपासून सर्वच जण कृषीप्रधान अर्थव्यवस्थेला घरघर लावण्यात समस्त राजकारणी व्यस्त असताना का संपावर गेले नाहीत ? आज अचानक संपाबद्दल पुळका दाखवणाऱ्यांकडे आधीच्या वर्षांचा हिशोब नाही. त्यामुळेच, आज केवळ शिवीगाळ करण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. अन्यथा इतरवेळी आविष्कार स्वातंत्र्याच्या फेका मारायच्या आणि स्वतःवर आल्यावर शेतकऱ्याला पुढे करून स्वतःचे हिशोब फेडायचे, हे कसले धंदे ?

  असल्या फुकटच्या बोंबलणाऱ्यांना सोशल मीडियावरच नव्हे, तर कुठेही बोंबलू द्यावे. शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्या संपाद्वारे आवर्जून लावून धराव्यात आणि न्याय्य पद्धतीने त्या मान्य करवून घ्याव्यात. मुंबईतील लोकांनाही शेतकऱ्यांविषयी सहानुभूती आहे आणि राहणार. कुणातरी भणंगाने टीका केली म्हणून काहीच फरक पडत नाही आणि पडणार नाही. शेवटी लोकशाहीतील सोशल मीडियाही आविष्कार स्वातंत्र्य जोपासणारच ना ?

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.