Advertisement

शिवसेनेसोबत काही मुद्द्यांवर मतभेद, तरीही...-राजनाथ सिंह


SHARES

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सत्तेत असूनदेखील भारतीय जनता पार्टीला विरोध करण्याची भूमिका घेतलेली आहे. शिवसेनेचा शेतकरी आंदाेलनाला पाठिंबा आणि याबाबतीत राज्य सरकारच्या धोरणांना विरोध असला, तरी लवकरच आम्ही चर्चेतून मार्ग काढू. शिवसेना हा आमचा सत्तेतील भागीदार आहे. एकाच घरात राहताना ज्याप्रमाणे घरातील सदस्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात मतभेद असतात. त्याचप्रमाणे शिवसेना आणि भाजपामध्ये काही मुद्द्यांवर मतभेद आहेत. ते आम्ही लवकरच दूर करू, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मुंबईत शिवसेनेसोबतच्या कुरबुरींवर भूमिका स्पष्ट केली.

शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी संपावरून सध्या शिवसेना-भाजपामध्ये धुसफूस सुरू आहे. उन्हाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीवरून मुख्यमंत्र्यांसह भाजप मंत्र्यांना लक्ष्य करून शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांनी चांगलंच त्रस्त करून सोडलं होतं. त्यापाठोपाठ शेतकरी आंदाेलनाला पाठिंबा जाहीर करून सरकारविरोधी भूमिका घेत आहे. मात्र शिवसेनेचा हा असहकार म्हणजे घरातील कुरबुरी असल्याचंच राजनाथ सिंह भासवत आहेत. 

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांत शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतकरी आंदोलनाला नियंत्रित ठेवण्यासाठी सुरक्षा दलांचाही वापर करण्यात येत आहे. मध्य प्रदेशातील मंदासोर येथे पोलिसांच्या गोळीबारात पाच आंदोलक शेतकऱ्यांच्या मृत्यू झाला असून महाराष्ट्रातही सलग पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे शेतकरी आक्रमक होत आहेत.

स्वतः शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या राजनाथ सिंह यांनी आपल्याला शेतकरी आंदोलनात सुरक्षा दलाचा कमीत कमी वापर व्हावा असं वाटतं, ही सावध प्रतिक्रिया दिली. मात्र, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेत्याच्या भूमिकेतून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्य प्रदेशात शिवराज चव्हाण यांना सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी केलं. केंद्र आणि राज्यातलं भाजपा सरकार शेतक-यांच्या प्रश्नांवर संवेदनशील असल्याचं सांगायलाही ते विसरले नाहीत.    

मंदसोरमधील शेतकऱ्यांना भेटायला निघालेले काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांना मध्य प्रदेशातील सीमेवर रोखण्यात आलं. याचं समर्थन करताना राजनाथ यांनी काँग्रेसवरही चांगलंच तोंडसुख घेतलं.

काँग्रेसने नेहमीच गरीब शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. सत्तेवर असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात टाळाटाळ केल्यानेच आज ते हलाखीच्या परिस्थितीत आहेत. या परिस्थितीला पूर्णपणेे काँग्रेस जबाबदार आहे, या शब्दांत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. 

काश्मीरमधील सद्यस्थितीवर भाष्य करताना त्यांनी काश्मिरमधील स्थिती सुधारण्यासाठी 'एकीकृत कायमस्वरुपी तोडगा' काढण्याचं ठोस आश्वासन दिलं. पाकिस्तानच्या छुप्या पाठिंब्याच्या जाेरावर काही देशविरोधी घटक काश्मीरमध्ये अशांतता पसरवत आहेत. तिथल्या  तरूणांची माथी भडकवणाऱ्यांना आम्ही चांगलाच धडा शिकवू, काश्मीरमध्ये हिंसा करणाऱ्यांनी स्वत:च्या मुलांप्रमाणेच काश्मीरमधील मुलांच्या भवितव्याचाही विचार करावा, असे सांगणाऱ्या राजनाथ यांनी त्यांंना विचारलेल्या कलम 370 संदर्भातल्या प्रश्नाला मात्र खुबीने बगल दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा