Video: निसर्गाचा बळी देऊन विकास नको! आरेतील वृक्षतोडीविरोधात अमित ठाकरेंनी उठवला आवाज

मुंबई मेट्रो ३ च्या कारशेडसाठी गोरेगाव पूर्वेकडील आरे काॅलनीतील झाडे तोडण्याची परवानगी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (MMRC)ला दिली आहे. या निर्णयाला निसर्गप्रेमींकडून कडाडून विरोध होत आहे. तसंच ८२ हजार मुंबईकरांनी या वृक्षतोडीला विरोध दर्शवलेला असताना निसर्गाचा बळी देण्याची गरज काय? असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी या वृक्षतोडीविरोधात आवाज उठवला आहे. एवढंच नाही, तर ‘सेव्ह आरे’साठी एकत्र येण्याचं आवाहनही मुंबईकरांना केलं आहे.

‘सेव्ह आरे’ कॅप्शनखाली अमित ठाकरे यांनी एक व्हिडिओ आपल्या फेसबुकवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ते मुंबईचा विकास नक्की व्हावा, परंतु तो निसर्गाचा बळी देऊन नाही, अशी भूमिका मांडली आहे.

 

काय म्हणाले अमित ठाकरे?

आपल्या व्हिडिओत अमित ठाकरे म्हणतात की, वृक्ष प्राधिकरणाने आरेतील २७०० झाडं कापण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी स्थानिकांशी चर्चा केली. तेव्हा ८२ हजार लोकांनी या वृक्षतोडीसंदर्भात तक्रारी नोंदवल्या. ८२ हजार लोकांनी तक्रारी नोंदवूनही जर आपण झाडं कापण्याचा निर्णय घेत असू तर संशय निर्माण होणारच.

मी तुमच्यासोबत

आम्ही कुठेही विकासाच्या विरोधात नाही, विकास नक्की व्हावा. पण निसर्गाचा बळी देऊन नाही. एका बाजूला अॅमेझाॅनच्या जंगलाला लागलेल्या आगीबद्दल अख्ख जग हळहळ व्यक्त करत असताना आपण, मुंबईचा श्वास असलेलं आरे नष्ट करायला निघालोय, यासारखी दुर्दैवी बाब नाही. पण या व्हिडिओद्वारे सर्व मुंबईकरांना आवाहन करतोय की तुमचा आवाज मोठा करा. व्यक्त व्हा. मी तुमच्या सोबत आहे. मी निसर्गासोबत आहे. 

काही दिवसांपूर्वीच निसर्गप्रेमींनी आरेत मानवी साखळी उभारून या वृक्षतोडीला विरोध केला होता. आता अमित ठाकरे यांच्या आवाहनाला मुंबईकर किती प्रतिसाद देतात, हे लवकरच स्पष्ट होईल.


हेही वाचा-

मेट्रो कारशेडसाठी आरेतील २७०२ झाडांची होणार कत्तल, महापालिकेने दिली परवानगी

काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा आरे कॉलनीत वृक्षतोडीला विरोध


पुढील बातमी
इतर बातम्या