आर्थिक निकषांवर आरक्षण द्या- राज ठाकरे

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातलं वातावरण तापलेलं असतानाच केंद्र सरकार आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याच्या विचारात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या आरक्षणाच्या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. जातीनिहाय नव्हे, तर आर्थिक निकषांवरच आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी त्यांनी शुक्रवारी पुण्यातील जाहीर सभेत केली. जातीनिहाय आरक्षणामुळं समाजात द्वेष आणि तेढ वाढत असल्याचं म्हणत त्यांनी आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यावर भर दिला.

आरक्षण कशासाठी?

आरक्षणावरून सध्या देशात घाणेरडं राजकारण सुरू असून आरक्षण आपण का आणि कशासाठी मागतोय? हाच खरा प्रश्न आहे. सरकारी क्षेत्रातील नोकऱ्या, सरकारी शाळां-महाविद्यालयांतील शिक्षणासाठी आरक्षणाची मागणी होते. पण सध्या काही सरकारी विभागासह शिक्षण क्षेत्रातही खासगीकरण झालं आहे. मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी यापुढे खासगी क्षेत्रातच उपलब्ध होणार असल्याने आपण आरक्षण का मागतोय आणि त्यासाठी का लढतोय ? असा सवालही राज ठाकरे यांनी केला.

केवळ राजकारण

यामागं केवळ राजकारण असून सरकार असो वा राजकीय पक्ष केवळ आपल्या भावनांशी खेळत आहेत. त्यांना फक्त आपलं मत हवंय. तेव्हा खरी काय परिस्थिती आहे ते समजून घ्या असा सल्लाही त्यांनी तरूणांना दिला.

मराठी माणसाला आरक्षण

खासगी क्षेत्रातील नोकऱ्या परप्रांतीय बळाकावत आहेत. त्यामुळं माझा मराठी बांधव बेरोजगार राहत आहे. राज्यातील सरकारी-खासगी नोकऱ्यांमध्ये ८० ते ९० टक्के नोकऱ्या स्थानिकांना द्याव्यात. राज्यातील शाळा-महाविद्यालयांमध्ये ८० ते ९० टक्के प्रवेश स्थानिकांना द्यावा. असं झालं तर शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी आरक्षणाची गरजच लागणार नाही, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

पंतप्रधान देशाचा

राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणं आपल्या खुमासदार शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टार्गेट केलं. देशात येणाऱ्या प्रत्येकाला पंतप्रधान अहमदाबाद दाखवतात. पंतप्रधान अमेरिकेत गेले तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी 'केम छे' म्हणत त्यांचं स्वागत केलं. मला नाही आवडलं, उद्या माझा मराठी बांधव पंतप्रधान झाला आणि तो अमेरिकेत गेल्यानंतर रामराम कसे आहात, काय चाललयं? असं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं तरी मला आवडणार नाही. कारण पंतप्रधान हा देशाचा असतो, तो देशाचं प्रतिनिधीत्व करतो कुणा एका राज्याचं नाही. त्यामुळं पंतप्रधान हा देशाचा असावा कुण्या एका राज्याचा नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना टोला लगावला.

एक मिठी वाढली

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना मारलेल्या मिठीची सर्वत्र चर्चा असताना राज ठाकरे यांनीही या मिठीवर भाष्य केलं आहे. पंतप्रधान देशविदेशात मिठ्या मारत फिरतात मग आणखी एक मिठी वाढली तर काय फरक पडला, असं म्हणत त्यांनी मिठीवर आपली प्रतिक्रिया दिली.

धर्म घरात पाळा

राममंदिराचा मुद्यावर बोलताना निवडणुकीनंतरच राममंदिर बांधण्यात यावं, राममंदिराच्या मुद्याचा वापर निवडणुकीत करू नये असा पुरूच्चारही त्यांनी केला. तर मासांहार-शाकाहार यावरून सुरू असलेल्या धार्मिक वादावरही त्यांनी यावेळी भाष्य केलं आहे. प्रत्येकानं आपला धर्म पाळावा, आपापल्या घरात धर्म पाळावा-जपावा असं म्हणत कुणी काय खायचं ते त्याचं त्यानं ठरवावं कुण्या तिसऱ्यानं सांगू नये, असंही ते यावेळी म्हणाले.


हेही वाचा-

भावा-बहिणींनो, जीवाचं बरं-वाईट करून घेऊ नका- राज ठाकरे

मराठा आरक्षण आंदोलनात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू


पुढील बातमी
इतर बातम्या