Advertisement

भावा-बहिणींनो, जीवाचं बरं-वाईट करून घेऊ नका- राज ठाकरे

मराठा आरक्षणावर सरकारनं याआधीच यावर निर्णय घ्यायला हवा होता. पण सरकार तुमच्या भावनांशी खेळत आहे. सरकारला नसेल पण तुमच्या घरच्यांना आणि महाराष्ट्राच्या उभारणीसाठी मला तुमच्यातल्या प्रत्येकाची साथ हवीय. त्यामुळं भावा-बहिणींनो उगाच जीवाचं बरं-वाईट करून घेऊ नका, असं भावानिक आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे

भावा-बहिणींनो, जीवाचं बरं-वाईट करून घेऊ नका- राज ठाकरे
SHARES

मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या मूकं मोर्चाचं रूपांतर ठोक मोर्चात झालं असलं तरी काही आंदोलक आत्महत्या करत आहेत. पण माझ्या महाराष्ट्रातील भावा-बहिणींनो तुमचा जीव सरकारला प्यारा नाही. मग ते आताचं सरकार असो वा याआधीचं सरकार. त्यांना फक्त तुमची मतं हवी आहेत. खरं तर सरकारनं याआधीच यावर निर्णय घ्यायला हवा होता. पण सरकार तुमच्या भावनांशी खेळत आहे. सरकारला नसेल पण तुमच्या घरच्यांना आणि महाराष्ट्राच्या उभारणीसाठी मला तुमच्यातल्या प्रत्येकाची साथ हवीय. त्यामुळं भावा-बहिणींनो उगाच जीवाचं बरं-वाईट करून घेऊ नका, असं भावानिक आवाहन केलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी.


ट्विटरवरून आवाहन

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्र तापला असून आंदोलनानं हिंसक वळण घेतलं आहे. रोज कुठंना कुठं बंद केला जात असून दगडफेक आणि जाळपोळीसारख्या घटना सुरूच आहेत. तर आतापर्यंत ३ आंदोलकांनी आत्महत्या केली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ट्विटद्वारे मराठा समाजाला, आंदोलकांना शांततेचं आवाहन करत आत्महत्येसारख्या टोकाची भूमिका घेऊ नका, अशी विनंतीही केली आहे.


मराठी म्हणून न परवडणारं...

मराठा मूक मोर्चाचं कौतुक मी स्वत: माझ्या ठाण्याच्या भाषणात केलं होतं. असे शांततापूर्ण मोर्चे इतिहासात कधीही निघाले नव्हते. मात्र काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूनं जे घडायला नको हवं होत तेच घडलं. त्यामुळं मी हात जोडून विनंती करतो की, कुठल्या मराठी तरूणानं मग तो मराठा असेल, धनगर, आगरी, वंजारी वा ब्राम्हण वा दलित आपल्या मागण्यासाठी जीव गमावू नका. आपल्याला मराठी म्हणून ते परवडणारं नाही असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.


'ही' परप्रांतीयांची इच्छा...

आपला खरा शत्रू ओळखा, जातीपातीच्या नावाखाली आपला मराठी समाज दुभंगणार नाही, याची काळजी घ्या. आपल्यावर आज जे संकट आलं आहे ते बाहेरून आलं आहे. जी बाहेरची माणसं महाराष्ट्राकडे फक्त लुटायचं केंद्र म्हणून पहातात त्यांच्याकडून आलं आहे. शिवाजी महाराज म्हणाले होते की, हिंदवी स्वराज्य व्हावं ही 'श्रीं'ची इच्छा. आता सध्याची परिस्थिती पाहिली की, वाटतं, आपण जातीजातीत भांडत रहावं, ही तो 'परप्रांतीयांची इच्छा' असं म्हणत राज ठाकरे यांनी सध्या परिस्थितीला राज्याबाहेरचे राजकारणी आणि राजकारण जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.


झेपत नसेल तर पायउतार व्हा

आरक्षणाच्या विषयावर बोलताना आरक्षणाची वस्तुस्थिती सरकारनं स्वच्छपणे सर्वांसमोर ठेवावी, आरक्षण दिल्यावर खरंच किती रोजगार सरकारी क्षेत्रात मिळणार, किती जागा शिक्षण क्षेत्रात उपलब्ध होणार, कायद्याच्या पातळीवर आणि संविधानाच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण देण्यात नेमक्या काय अडचणी आहेत, त्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारकडे काय योजना आहेत, अशा सर्व गोष्टी सरकारनं मांडाव्यात अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. तर सरकारला हे झेपत नसेल तर सरकारनं सरळ पायउतार व्हावं, उगाच लोकांच्या मनाशी आणि भावनांशी खेळत बसू नये असा टोलाही सरकारला लगावला आहे.



हेही वाचा-


हिंसा नको चर्चा करा- मुख्यमंत्री

हिंमत असेल तर शासकीय वसाहतीतील रहिवाशांना बाहेर काढून दाखवाच– राज ठाकरे



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा