मनसैनिकांचं मुंबईत 'पाटी'दार आंदोलन, वसईनंतर कांदिवलीत तोडफोड

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रविवारच्या भाषणानंतर मनसैनिकांनी पुन्हा एकदा मराठी पाट्यांचा मुद्दा हाती घेऊन इतर भाषेतील पाट्यांची तोडफोड करण्याचं सत्र सुरू केलं आहे. रविवारी रात्रीच वसईतील गुजरातीमधून लिहिलेल्या पाट्या तोडल्यानंतर कांदिवलीतील गुजरातीमधील दुकानाच्या पाट्या मनसैनिकांनी सोमवारी दुपारी तोडल्या.

बघा, अशी केली तोडफोड

नेमका प्रकार काय?

कांदिवलीतील एम. जी. रोड परिसरात एक राजूभाई ढोकळावाला हे फरसाणचं दुकान असून या दुकानावर गुजरातीत पाटी लावण्यात आली होती. ही पाटी हटवण्याविषयी दुकानमालक राजू ढोकळावाला याला सांगूनही त्याने पाटी न हटवल्याने आक्रमक मनसैनिकांनी ही पाटी तोडली.

आतापर्यंत मनसेकडून संबंधित दुकानदाराला अनेकवेळा निवेदन देण्यात आलं होतं. मात्र या निवेदनाची दुकानदाराने दखल न घेतल्याने आम्हाला नाईलाजाने त्याला मनसे स्टाईल दाखवावी लागली. आम्ही कांदिवली स्टेशनलगतच्या फेरीवाल्यांविरोधातही आंदोलन छेडलं असून योग्य वेळ येईल, तेव्हा मराठीच्या हक्कासाठी समर्थपणे लढू.

- दिनेश साळवी, विभाग प्रमुख, कांदिवली

बघा, अशी केली तोडफोड

जाता जाता तोडफोड...

रविवारी राज यांनी जाहीर सभेत मोदी आणि त्यांच्या गुजरातप्रेमाला टार्गेट केल्यानंतर आक्रमक मनसैनिकांनी सभेवरून परततानाच रात्रीच मुंबई-अहमदाबाद मार्गावरील गुजराती दुकानांना लक्ष्य केलं. राज ठाकरेंच्या भाषणानंतर आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी खळखट्याक करत मुंबई-अहमदाबाद मार्गावरील हॉटेल-दुकानांवरील गुजराती पाट्या हटवल्या. वसई परिसरातील सुमारे १० ते १२ कार्यकर्त्यांनी घोषणा देत या पाट्या हटवल्या.


हेही वाचा-

भारत मोदीमुक्त करा- राज ठाकरे

देशातला मीडिया मोदीनियंत्रीत- राज ठाकरे


पुढील बातमी
इतर बातम्या