अखेर राणे मोदींना भेटले!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस आमदार नारायण राणे यांची भेट झाली. पण ही भेट दिल्लीत नाही तर राणेंच्या जिल्ह्यात, म्हणजेच सिंधुदुर्गात झाली. या भेटीचा योग महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यानं न आणता नारायण राणे यांचे पुत्र आणि काँग्रेसचे कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनीच घडवून आणला. एवढं वाचल्यानंतर वाटणारं आश्चर्य लपवणं अवघड आहे, हे खरंच. नक्की झालं तरी काय? 

देवगडमध्ये आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या वॅक्स म्युझियमचं उद्घाटन नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आलं. या वॅक्स म्युझियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. मोदींचा हाच पुतळा नारायण राणे पाहत असतानाचं छायाचित्र त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी ट्विटरवर टाकत राणेंच्या भाजपा प्रवेशाबाबत सूचक इशारा दिला आहे. ज्या क्षणाची प्रसारमाध्यमं आतुरतेने वाट पाहत आहेत, तो क्षण आला असल्याचं सूचक ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे. हे आपलं आवडतं छायाचित्र असल्याची 'अधिकची माहिती'सुद्धा नितेश राणे यांनी दिली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये नाराज असलेले नारायण राणे भाजपामध्ये प्रवेश करणार ही बातमी गल्लीपासून दिल्लीपर्यंत चघळली जात आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची नारायण राणेंनी अहमदाबादमध्ये घेतलेल्या गुप्त भेटीची चर्चा तसंच नारायण राणे आणि नितेश राणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास करतानाची व्हायरल दृश्यं, या घटना-प्रसंग-चर्चांमुळे राणेंच्या भाजपा प्रवेशाची शक्यता अधिक दाट झाली. आता तर खुद्द मोदी आणि राणे भेटीचं छायाचित्र नितेश राणे यांनीच प्रसिद्ध केलं आहे. त्यामुळे आता नारायण राणे लवकरच काँग्रेसचा हात सोडून भाजपाच्या तंबूत दाखल होतील, यावर केवळ शिक्कामोर्तब होणं एवढंच बाकी राहिलं असल्याची चर्चा नारायण राणे यांच्या समर्थकांमध्ये रंगायला लागली आहे.


हेही वाचा

राणे- तेलींमध्ये जवळीक?

राणेंना मुहूर्त मिळाला ?

राणेंचा भाजपाप्रवेश 'मुंबई लाइव्ह'च्या वृत्तामुळे लांबला


पुढील बातमी
इतर बातम्या