Advertisement

राणे- तेलींमध्ये जवळीक?


राणे- तेलींमध्ये जवळीक?
SHARES

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नारायण राणे भारतीय जनता पार्टीत जाणार, अशी चर्चा गेले अनेक दिवस राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची राणेंनी अहमदाबादमध्ये घेतलेल्या गुप्त भेटीची चर्चा असो वा नारायण राणे आणि नितेश राणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गाडीत बसलेले व्हायरल झालेले फोटो असोत. या सगळ्यामुळे राणेंच्या भाजपा प्रवेशाच्या शक्यता अधिकाधिक दाट झाल्याची चर्चा रंगत गेली. गुरुवारी एका कार्यक्रमात चक्क माजी खासदार निलेश राणे आणि माजी आमदार राजन तेली एकत्र बसून गप्पा मारताना दिसले आणि उपस्थितांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या. कोकणातल्या आंबोलीमध्ये एका लग्नसमांरभावेळी हे दोन्ही नेते एकमेकांशी थट्टा-मस्करी करताना दिसले. जवळपास तासभर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माजी आमदार राजन तेली हे नारायण राणे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक मानले जात होते.

शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राणे यांच्यासोबत तेली यांनी काँग्रेसप्रवेश केला होता. राणेंच्या कृपेमुळे त्यांनी विधान परिषदेत आमदारकीही मिळवली. मात्र काही वर्षांपूर्वी राणेंशी वैर घेत त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. गेली दोन ते तीन वर्षे एकमेकांचा चेहराही न पाहणारे तेली आणि राणे कुटुंबीय हे कट्टर वैरी मानले जात होते. त्यातच राजन तेली यांचा मुलगा प्रथमेश तेली याला मुंबईतल्या दादर स्थानकावर झालेल्या मारहाणीत नितेश राणे यांचा हात असल्याचा आरोप तेली यांनी केला होता. 

अशा सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर अचानक माजी खासदार निलेश राणे यांच्या बाजूला राजन तेली बसल्यानं अनेकांना आश्चर्य वाटणं स्वाभाविकच होतं. राजन तेली आणि निलेश राणे यांच्यामध्ये सुरुवातीला गळाभेट झाली आणि त्यानंतर या दोघांमध्ये मनमुराद गप्पा रंगल्या. "झालं गेलं विसरुन जाऊ आणि भाजपात दोघांनी एकत्र काम करू," असं तर निलेश राणे राजन तेली यांना सांगत नसावेत ना? दोघांचा एकत्रित फोटो पाहून तरी तसंच वाटतंय. बाकी खरं-खोटं राणे आणि तेलीच जाणोत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा