राणेंचा भाजपाप्रवेश 'मुंबई लाइव्ह'च्या वृत्तामुळे लांबला

Dadar (w)
राणेंचा भाजपाप्रवेश 'मुंबई लाइव्ह'च्या वृत्तामुळे लांबला
राणेंचा भाजपाप्रवेश 'मुंबई लाइव्ह'च्या वृत्तामुळे लांबला
See all
मुंबई  -  

काँग्रेसचा 'हात' सोडून भारतीय जनता पार्टीची साथ देण्याचा निर्णय नारायण राणे यांनी पुढे ढकलला आहे. नारायण राणे 'भाजपावासी' होणार हे वृत्त 'मुंबई लाइव्ह'ने ठामपणे दिलं. 16 एप्रिलला भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समारोपप्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत राणे आपल्या दोन पुत्रांसह भाजपात औपचारिकरीत्या प्रवेश करतील, हेही 'मुंबई लाइव्ह'च्या वृत्तात स्पष्टपणे म्हटलं आहे. 16 एप्रिलचा सूर्य मावळतीकडे जाईपर्यंत नारायण राणे यांच्या भाजपाप्रवेशाबाबतच्या बातमीची खातरजमा 'मुंबई लाइव्ह' कडे अनेकांनी केली. बातमीत नमूद केलेली तारीख उलटत आली. पण राणे भाजपात प्रवेशकर्ते झाले नाहीत. आता 'मुंबई लाइव्ह' काय भूमिका घेणार? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. नारायण राणे यांच्याबद्दल दिलेल्या वृत्तावर 'मुंबई लाइव्ह' आजही ठाम आहे.

[ आधी हे वाचा -  अखेर ठरलं...नारायण राणे 16 एप्रिलला भाजपात जाणार  ]

“नारायण राणे भाजपात जाणार, ही याक्षणी काळ्या दगडावरची रेघ आहे. डोळे दीपवणारा राजकीय चमत्कार वगळता ही रेघ पुसली जाणार नाही, हे नक्की.” या ओळींवर राणेंच्या भाजपाप्रवेशाबद्दलच्या संबंधित बातमीचा शेवट केला आहे. सदर ओळींमध्ये अभिप्रेत असलेला राजकीय चमत्कार झाला, हे नक्की. तो कोणता? हे जाणून घेण्यात राणे समर्थक, विरोधक आणि अगदी तटस्थ राजकारणी तसंच सर्वसामान्य मतदारही उत्सुक आहेत. 

भाजपाच्या उडिशामध्ये झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात राणेंच्या भाजपाप्रवेशाचा मुहूर्त हुकला, याचं प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या भाजपाप्रवेशाची ‘लिक झालेली’ बातमी. अवघ्या आठवड्याभरात दोनदा राणे यांची भाजपाप्रवेशाच्या दिशेने पडणारी पावलं रेंगाळली ती त्यांना अपेक्षित वेळेआधी माध्यमांपर्यंत बातमी पोहोचल्यामुळे! अहमदाबादमध्ये त्यांच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याशी झालेल्या भेटीचे पुढे आलेले व्हिडिओ पुरावे नारायण राणे यांनी तत्परतेने नाकारले. त्यानंतर भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षांतराची बातमीसुद्धा गोपनीय ठेऊनही ती 'मुंबई लाइव्ह'पर्यंत पोहोचली. ‘मुंबई लाइव्ह’ची ही बातमी सर्वमुखी झाली. अधिकृत जाहीर न केलेली बातमी सार्वजनिक होणं ही दिल्लीत बसलेल्या पक्षश्रेष्ठींसाठी नक्की गंभीर बाब होती. याबाबत दिल्लीतून महाराष्ट्रातल्या नेत्यांना जाबही विचारला गेला.

[ हे सुद्धा वाचा - मी अहमदाबादमध्ये अमित शाह अथवा देवेंद्र फडणवीस यांना भेटलो नाही- राणे ]

विशेष म्हणजे काही खातरजमा करणारे आणि काही पुष्टी देणारे फोनकॉल्स ‘मुंबई लाइव्ह’कडे आले. भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आलेले हे फोनकॉल्स आहेत. नेत्यांची नावं जाहीर करणं शिष्टसंमत आणि पत्रकारितेतल्या नैतिकतेला धरुन होणार नाही.

नारायण राणे यांचे पक्ष आणि पक्षाबाहेरील हितशत्रू त्यांच्या राजकीय हिताच्या आड येत आहेत, असा नारायण राणे यांचा आरोप आहे. भाजपातल्या काही नेतामंडळींनी त्यांच्या भाजपाप्रवेशाबाबतच्या बातम्या ‘फोडल्या’, असा राणेंना संशय आहे.  राणे यांच्या भाजपाप्रवेशामुळे शिवसेनेची नाराजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाला भोवू शकते. म्हणून भाजपाने तूर्तास आस्ते कदम घेतल्याचा एक तर्क लढवला जात आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रपतीपदाबाबत उद्भवू शकणाऱ्या संभाव्य अडचणींवर उतारा शोधल्यानंतरच भाजपाश्रेष्ठींनी राणे यांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदिल दिला.

असो. राणेंचा मुहूर्त हुकला हे खरंच आहे. पण या बातमीबाबत दिलेली वेळ हा एकमेव संदर्भ वगळता ही बातमी, किंबहुना राणे यांच्या संभाव्य पक्षांतराबाबतच्या प्रत्येक बातमीतली सत्यता 'मुंबई लाइव्ह' च्या वाचकांनी वेळोवेळी पाडताळून पाहिली आहेच. राजकीय बातम्यांमध्ये क्षणाक्षणाला बदल जाणाऱ्या संदर्भांमुळे मोठे बदल घडल्याची कितीतरी उदाहरणं आहेत. तारीख, वार आदी संदर्भ दिल्यानंतर त्यात बदल झाला तर काय? हा विचार करुन 'मुंबई लाइव्ह' सुद्धा शीर्षकात प्रश्नचिन्ह मांडून सावध भूमिका घेऊ शकलं असतं. पण ‘मुंबई लाइव्ह’चं इमान वाचक आणि प्रेक्षकांशी आहे. सावध राहत त्यांच्यापर्यंत संदिग्ध बातमी पोहोचवण्यापेक्षा योग्य आणि त्या क्षणी समोर आलेली ठाम बातमी देणं, हे 'मुंबई लाइव्ह'चं वैशिष्ट्य आहे. नारायण राणे यांच्या ‘16 एप्रिलला न झालेल्या’ भाजपाप्रवेशाच्या निमित्तानेसुद्धा हाच ठामपणा पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.