ईडीच्या कार्यालयात जाण्याचा शरद पवार यांचा निर्णय रद्द

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालया (ED)ने गुन्हा नोंदवल्यावर स्वत:हून ईडीच्या कार्यालयात जाण्यास निघालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर आपला निर्णय शुक्रवारी दुपारी मागे घेतला. पवार ईडीच्या कार्यालयात हजर राहिल्यास राज्यभरातील कायदा-सुव्यवस्था बिघडू शकते, त्यामुळे त्यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊ नये, अशी विनंती मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी केल्यानंतर पवार यांनी आपला निर्णय बदलला.

गुन्हा दाखल का केला?

यानंतर मुंबईतील सिल्व्हर ओक या निवास्थानाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्र राज्य शिखर बँकेच्या संचालक पदावर नसताना किंवा या बँकेचा सदस्यही नसताना ईडीने माझ्यावर या बँकेतील घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर मी स्वत:हून पुढं येत शुक्रवारी ईडीला चौकशीत हवं ते सहकार्य करण्याची तयारी दाखवली. त्यासाठी शुक्रवारी दुपारी ईडीच्या कार्यालयात जाण्याचंही ठरवलं. तशी लेखी माहितीही त्यांना दिली.

प्रतिमा मलिन करण्यासाठी

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या असताना विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे, ही माझी भूमिका मांडण्यासाठी मी ईडीच्या कार्यालयात जाणार होतो. परंतु जोपर्यंत तुम्हाला बोलवण्यात येणार नाही, तोपर्यंत कार्यालयात येण्याची गरज नाही. चौकशीची गरज असल्यास तुम्हाला पूर्वसूचना देऊ, असं लेखी उत्तर त्यांच्याकडून देण्यात आलं.

कार्यकर्ते संतापले

माझ्या नावे गुन्ह्याची नोंद झाल्यावर राज्यभरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले आहेत. अनेक कार्यकर्ते मुंबई गाठायला निघाले आहेत. परंतु त्यांना मुंबईबाहेर अडवून ठेवण्यात आलं आहे. मी ईडीच्या कार्यालयात गेल्यास राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चिघळू शकते, त्यामुळे मी ईडीच्या कार्यालयात जाऊ नये, अशी विनंती राज्य सरकारतर्फे मला मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी केली. माझ्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये म्हणून मी ईडीच्या कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला आहे, ” असं पवार म्हणाले.

सोबतच अडचणीच्या काळात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल पवार यांनी त्यांचे आभारही मानले.  


हेही वाचा-

शरद पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाणारच, परिसरात जमावबंदी लागू

शरद पवार लढवणार का साताऱ्याची पोटनिवडणूक? उदयनराजेंची कोंडी करण्याची खेळी


पुढील बातमी
इतर बातम्या