राष्ट्रवादी साळवेच्या पाठिशी आहे की नाही? दोन नेत्यांमध्येच दुमत

शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मंत्रालयाच्या ७ व्या मजल्यावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारा ज्ञानेश्वर साळवे हा तरुण राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलं आहे. असं असतानाही साळवे राष्ट्रवादीचा आहे की नाही? यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रवक्ते नवाब मलिक हे दोन बडे नेतेच गाेंधळात असल्याचं स्पष्ट होत आहे.

राष्ट्रवादीवर आरोप

शुक्रवारी संध्याकाळी मंत्रालयाच्या ७ व्या मजल्यावर चढत उस्मानाबादमधील एका शेतकरी तरुणाने शेतीसंदर्भात व्यथा मांडण्यासाठी कृषीमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु त्याला भेट न मिळाल्याने त्याने आंदोलन केलं. त्याच्या या कृतीनंतर राष्ट्रवादीकडे बोट दाखवण्यात आलं. तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे आणि राष्ट्रवादीने त्याला आंदोलन करायला सांगितलं असा आरोप करण्यात आला.

तटकरे म्हणताहेत, पक्षाशी संबंध नाही

त्यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ज्ञानेश्वर साळवे हा राष्ट्रवादीचा क्रियाशील कार्यकर्ता नसल्याचं म्हटलं आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्हापरिषद निवडणुकांच्यावेळी तो पक्षात आला. पण त्यानंतर त्याचा पक्षाशी कोणताही संबंध नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मलिक म्हणताहेत, पक्षाला अभिमान

तर, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उस्मानाबादमधील ज्ञानेश्वर साळवेने पक्षाच्या आदेशावरुन कृती केलेली नसली, तरी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर इतक्या तळमळीने आंदोलन करत असेल तर पक्षाला त्याचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे.

या दोन नेत्यांच्या विधानावरून पक्ष खरंच साळवेच्या पाठिशी आहे की नाही, हे स्पष्ट होत नसल्याचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं म्हणत आहेत.

शुक्रवारी दुपारी मला एक फोन आला. समोरून बोलणारा व्यक्ती मी मंत्रालयात जाऊन आत्महत्या करणार असल्याचं मला सांगत होता. मी त्याला वय विचारल्यावर तो म्हणाला २२ वर्षे. तेव्हा मी त्याला म्हटलं एवढ्या तरूणपणी तू का आत्महत्या करतोय? तेव्हा त्याने मला कृषीमंत्री भेटत नसल्याच सांगितलं. त्यावेळी तुम्ही आम्हाला भेटा तुमची समस्या घेऊन आम्ही तुम्हाला कृषीमंत्र्यांकडे घेऊन जातो असं मी सांगितलं. त्याला समजावलं. पण त्याने फोन बंद केला. त्यानंतर जो काही प्रकार झाला तो सर्वांनी पाहीला. राष्ट्रवादी काँग्रेस अश्या कुठल्याही गोष्टीला समर्थन देत नाही. त्या व्यक्तीचा राष्ट्रवादी पक्षाशी कोणताही संबंध नाही.

- सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

उस्मानाबादमधील शेतकरी ज्ञानेश्वर साळवे हा पक्षाचा कार्यकर्ता असला तरी त्याला पक्षाने अशी कृती करायला सांगितली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर इतक्या तळमळीने आंदोलन होत असेल तर पक्षाला ज्ञानेश्वरचा अभिमान आहे.

- नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस


हेही वाचा-

जयंत पाटलांनी किंग खानला का झापलं? वाचा...

नारायण राणे चुकूनही मंत्री बनणार नाहीत- दीपक केसरकर

मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'गोलमाल अगेन' - नवाब मलिक


पुढील बातमी
इतर बातम्या