Advertisement

मंत्रालयाच्या ७ व्या मजल्यावरून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न


मंत्रालयाच्या ७ व्या मजल्यावरून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न
SHARES

'मला कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना भेटू द्या, नाहीतर मी आत्महत्या करेन', अशी धमकी देत एक तरूण सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील खिडकीच्या सज्जावर उभा राहिल्याने सुरक्षा यंत्रणांसह सर्वांची पळता भुई थोडी झाली.
पोलीस आणि अग्निशमन जवानांनी अंदाजे पाऊण तास समजूत घातल्यानंतर या तरूणाला ५.४५ वाजेच्या सुमारास सुखरुप खाली उतरवण्यात आलं. या तरूणाचं नाव ज्ञानेश्वर साळवे असं असून तो उस्मानाबादच्या तुळजापूर तालुक्यातील मसलाखुर्द गावात राहणारा आहे. 


मंत्रालयात एकच खळबळ

सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास एक तरूण राज्याचं प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयाच्या ७ मजल्यावरील खिडकीबाहेरील सज्जावर उभा राहिल्याचं सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्यावर एकच खळबळ उडाली. हा तरूण सतत कुणासोबत तरी फोनवरून बोलत होता. सोबतच कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना भेटण्याची मागणी करत होता. त्यांनी भेट न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकीही त्यांनी दिली.


'स्वामीनाथन आयोग लागू करा'

हा तरूण सतत सज्जाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाला ये-जा करत असल्याने त्याला बघण्यासाठी खाली बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठी त्यानी हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. एका बाजूला पोलीस आणि अग्निशमन अधिकारी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसऱ्या बाजूला त्याने उडी मारलीच तर त्याला अलगद झेलण्याची तयारी खाली अग्निशमन विभागाने केली.


असं उतरवलं खाली 

कृषीमंत्री मुंबईत नसल्याने त्यांची भेट घेणं अशक्य होतं. अखेर पाऊण तासानंतर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील आणि गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर सातव्या मजल्यावर पोहोचले. त्यांनी समजूत घातल्यानंतर या तरूणाला सुखरूप खाली उतरवण्यात आलं.


या तरुणाच्या सगळ्या मागण्या जनतेच्या हिताच्या होत्या. शेतमालाला हमीभाव, स्वामिनाथन आयोगाची मागणी अशा शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या त्याने मांडल्या. आमचा प्रमुख उद्देश त्याचा जीव वाचवणं हा होता. त्याच्या सर्व मागण्यांमध्ये आम्ही लक्ष घालू. तरुणांनी आंदोलने करावीत; पण असा स्वत:चा जीव धोक्यात घालून करून नये.
- विनोद तावडे, शिक्षण मंत्री


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा