साम, दाम, दंड, भेदचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी सांगावा- उद्धव ठाकरे

आॅडियो क्लिप प्रकरणामुळे पालघर पोटनिवडणूक चांगलीच गाजतेय. 'ही क्लिप माझीच आहे, पण ही क्लिप अर्धवट असून काटछाट करत ही क्लिप एेकवण्यात आाली आहे' असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावर डिजिटल इंडियाचा नारा देणाऱ्या भाजपाने खुशाल या आॅडियो क्लिपची चौकशी करावी, पण आधी मुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थही सर्वांना सांगावा असं खुलं आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं.

रविवारी दुपारी मुंबईतील नालेसफाईच्या कामांची पाहणी करत असताना पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना आॅडियो क्लिप वादासंदर्भात प्रश्न विचारला असता, त्यांनी मुख्यमंत्र्यांना हे आव्हान दिलं.

काय म्हणाले उद्धव?

क्लिपमध्ये छेडछाड करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. डिजिटल इंडियाचा नारा देणाऱ्या सरकारकडे तसे तंत्रज्ञ असतील, तर त्यांनी त्यांना कामाला लावून छेडछाड झाल्याचं शोधून काढावं आणि कुणावर कारवाई करायची असेल, ती खुशाल करावी.

मान्य केलंच

''पण, आधी मुख्यमंत्र्यांनी हे सांगावं की कूटनिती म्हणजे काय? साम, दाम, दंड, भेद या शब्दाचा अर्थ त्यांनी सांगावा. आमची त्यांच्याकडून मराठी शिकण्याचीही तयारी आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी कळत नकळत हे मान्यच केलं आहे की या क्लिपमधील आवाज त्यांचाच आहे.''

काय आहे आॅडियो क्लिप प्रकरण?

प्रतिष्ठेची ठरलेली पालघर लोकसभा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेने चांगलाच जोर लावला आहे. त्यातच भाजप कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना पालघर निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या सर्व अस्त्रांचा वापर करण्याच्या 'सूचना' मुख्यमंत्री देत असल्याची एक आॅडियो क्लिप शिवसेनेच्या हाती लागली आणि लागलीच ही क्लिप व्हायरलही झाली.

मित्र म्हणवून पाठीत खंजीर

''एक प्रचंड मोठी लढाई आपल्याला लढायची आहे. आपल्या अस्तित्वाला कुणी आव्हान देत असेल आणि आपल्याशी विश्वासघात करत असेल, एखादा पक्ष आपला मित्र म्हणता म्हणता आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेल तर त्यांना जशास तसं उत्तर दिलं पाहिजे'', असा उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये असल्याचा दावा करत शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना टिकेचं लक्ष्य केलं.

त्यावर उत्तर देताना पालघरमधील सभेत मुख्यमंत्र्यांनी ही क्लिप माझीच असून ती शिवसेनेने मोडूनतोडून सादर केली. साम-दाम-दंड-भेदचा अर्थ कूटनिती असा होतो. या क्लिपमध्ये माझं अर्धवट वाक्य ऐकवण्यात आलं आहे. त्यामुळे क्लिप मोडूनतोडून सादर करणाऱ्या शिवसेनेवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.


हेही वाचा-

...तर मी इथं भाजपाच्या प्रचारासाठी आलो असतो- उद्धव ठाकरे

'शिवाजीचं नाव घेऊन अफझलखानासारखं काम', योगीचा शिवसेनेवर बाण


पुढील बातमी
इतर बातम्या