चंद्रकांत पाटलांची वादग्रस्त वक्तव्यावर दिलगिरी

''ज्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळं ५ जणांचा बळी गेला, त्याच रस्त्यावरून ५ लाख लोक व्यवस्थित जातात. त्यामुळे रस्त्याचा दोष असेल तर बळी गेलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना अार्थिक मदत करू'', असं बेजबाबदार वक्तव्य करणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कल्याणकरांच्या रोषापुढं नमतं घेत सोमवारी विधानसभेत दिलगिरी व्यक्त केली.

बळींबाबत अनभिज्ञ

मुंबई, कल्याण, ठाणे, नवी मुंबई असं सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य असून या खड्ड्यांमुळे आतार्पंत ६ बळी गेले आहेत. त्यामुळे खड्ड्यांवरून सध्या मुंबईत वातावरण पेटलं असून, राजकीय पक्षांकडून जागोजागी आंदोलनही सुरू आहे. पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मात्र या बळींबाबत अनभिज्ञ असल्याची कबुली त्यांनी स्वत: च प्रसारमाध्यमांना दिली.

भावना दुखवायच्या नव्हत्या

खड्ड्यांमुळे बळी गेलेल्या व्यक्तींबाबत बेजबाबदार वक्तव्य केल्यानंतर पाटील यांच्याविरोधात राज्यभरातून संताप व्यक्त होत होता. कल्याणकरांनी पाटील यांच्याविरोधात उघड नाराजी व्यक्त केली. या रोषानंतर अखेर सोमवारी पाटील यांनी युटर्न घेत या वक्तव्याबाबत विधानसभेत दिलगिरी व्यक्त केली. खड्ड्यांचा प्रश्न गंभीर असून आपल्याला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या, असं म्हणत पाटील यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरू केला.

पुन्हा हात वर

ज्या ज्या रस्त्यावर खड्डे पडतात त्या खड्ड्यांची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची असल्याचंही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. असं म्हणत पुन्हा एकदा पाटील यांनी खड्ड्यांबाबत हात वर करत स्थानिक स्वराज्य संस्थेकडेच बोट दाखवलं आहे.


हेही वाचा-

तर, अधिकाऱ्यांना झोडपून काढू- संदीप देशपांडे

तुर्भेत खड्ड्यांविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक!


पुढील बातमी
इतर बातम्या