व्हाईटमनी v/s ब्लॅकमनी, विरोधक, रिपाइंत जुंपणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी काळ्या पैशाविरोधात सर्जिकल स्ट्राईक करत नोटाबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मोदींच्या या निर्णयाला १ वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मोदी सरकारचा हा निर्णय कसा फसला? हे दाखवून देण्यासाठी विरोधक 'काळा दिवस' साजरा करत असताना रिपाइं या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी 'व्हाईट मनी' डे साजरा करणार आहे.

काँग्रेसचं नोटाबंदीचं श्राद्ध  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटाबंदीचा निर्णय हा पूर्णपणे खोटा आणि फसलेला निर्णय आहे. जगाच्या इतिहासात कोणत्याही देशाने आजपर्यंत नोटाबंदीचा निर्णय घेतला नव्हता. नोटाबंदीचा तुघलकी निर्णय मोदींनी घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठं भगदाड पाडून देशाला ५० वर्षे मागे नेण्याचं काम केल्याचा आरोप करत काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी आम्ही काँग्रेसतर्फे या निर्णयाचं श्राद्ध घालणार असल्याची प्रतिक्रिया 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली आहे.

आझाद मैदानात मेणबत्ती मोर्चा

काँग्रेस बुधवारी आझाद मैदानात नोटाबंदीचं श्राद्ध घालणार आहे. तर नोटाबंदीदरम्यान बॅंकांच्या रांगेत ज्या नागरिकांचा मृत्यू झाला, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जुहूत मेणबत्ती मोर्चा काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अशोक चव्हाण, प्रभारी मोहन प्रकाश आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित राहतील.

नोटाबंदी म्हणजे देशातला सर्वात काळाकुट्ट दिवस. या दिवसाला ‘आर्थिक दहशतवाद’ म्हणून संबोधलं पाहिजे. या आर्थिक दहशतवादाचे प्रणेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकार आहे. पंतप्रधान मोदी यांनी या 'आर्थिक दहशतवादा'ने अनेक नागरिकांचे प्राण घेतले आहेत.

- राजू वाघमारे, प्रवक्ते, काँग्रेस

रिपाइंचा 'व्हाईट मनी डे' 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळा पैसा रोखण्यासाठी दर १० वर्षांनी चलन बदलण्याचा विचार सांगितला होता. त्यानुसार पंतप्रधान मोदींनी मागच्या वर्षी ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटांवर बंदी आणून चलन बदलले. या क्रांतिकारक निर्णयाच्या समर्थनार्थ रिपब्लिकन पक्ष देशभर 'व्हाईट मनी डे' साजरा करणार आहे, अशी माहिती रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

नोटाबंदीचं समर्थन

नोटबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता दादर चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन करून 'व्हाईट मनी डे' साजरा करण्यात येणार आहे. नोटाबंदीच्या वर्षपूर्ती उत्सवसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करण्यात येईल. याचप्रकारे प्रत्येक जिल्ह्यात डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जमून रिपाइंचे कार्यकर्ते नोटाबंदीचं समर्थन करतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

पंतप्रधान मोदींनी घेतलेला निर्णय क्रांतिकारी आहे. बनावट चलन, काळा पैसा यावर बंदी घालण्याचसाठी मोदींनी हा निर्णय घेतला. आता नागरिकांना थोडा त्रास होता असला तरी निश्चित भविष्यात फायदे होतील. त्यामुळे रिपाइं या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी 'व्हाईट मनी डे' साजरा करणार आहे.

- गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष, रिपाइं


हेही वाचा - 

पंतप्रधान नोटाबंदीच्या अपयशाची जबाबदारी घेणार का? - पी. चिदंबरम

नोटाबंदीमुळे भ्रष्टाचारात घट


पुढील बातमी
इतर बातम्या