मुंबई विद्यापीठाच्या गोंधळावरून लक्ष हटवण्यासाठीच भगवद्गीता वाटप- उद्धव

नागपुरातील पावसाळी अधिवेशनात भगवद्गीता वाटप कार्यक्रमावरून विरोधकांचं लक्ष्य ठरलेल्या भाजपाने मुंबई विद्यापीठातील गाेंधळ लपवण्यासाठी भगवद्गीता वाटपाचा कार्यक्रम हाती घेतल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली.

उद्धव ठाकरे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान पुण्यात पत्रकारांसोबत संवाद साधताना त्यांनी भगवद्गीता वाटपावरून भाजपा सरकार आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर तोंडसुख घेतलं.

काय म्हणाले उद्धव?

मुंबई विद्यापीठातील गोंधळामुळे परीक्षांचे निकाल उशीरा लागले. पेपरफुटीची अनेक प्रकरणे झाली. यामुळे विद्यार्थ्यांसहित सर्वसामान्यांकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या गोंधळावरून लक्ष हटवण्यासाठी भाजपाने मुंबईतील काॅलेजांमध्ये भगवद्गीता वाटपाच्या कार्यक्रमाची घोषणा केली. ही भगवद्गीता नक्की संस्कृतमध्ये आहे की गुजरातीत हे बघण्यासाठी मला ती चाळायची आहे. भगवद्गीता वाटपाऐवजी सरकारने विद्यापीठाचे निकाल वेळेवर लावल्यास बंर होईल, असा टोला उद्धव यांनी हाणला.

खड्ड्यांची जबाबदारी सर्वांची

मात्र पत्रकारांनी मुंबईतील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारला असताना खड्ड्यांची जबाबदारी सर्वांचीच असल्याचं म्हणत त्यांनी या प्रश्नाला बगल दिली.

नाणारला विरोध कायम

नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम राहील. समृद्धी महामार्ग आणि नाणार प्रकल्प वेगळा आहे. मुख्यमंत्र्यांनी नाणारवासीयांवर प्रकल्प लादणार नाही, असं आश्वासन दिलं आहे. तरीही रहिवाशांचा विरोध डावलून हा प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना हा प्रयत्न हाणून पाडेल, असंही उद्धव यांनी स्पष्ट केलं.


हेही वाचा-

काॅलेजांत भगवद्गीता वाटण्याचा निर्णय मागे?

...तर काॅलेजमध्ये कुराण, बायबलही वाटू- शिक्षणमंत्री


पुढील बातमी
इतर बातम्या