अयोध्येत उद्धव ठाकरे हिंदीतून तासभर भाषण करणार?

निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनानुसार भाजपाला अयोध्येत राम मंदिर उभारता येत नसेल, तर आम्ही देशातील तमाम हिंदूंना सोबत घेऊन राम मंदिर उभारू, असं आव्हान दसरा मेळाव्यातील व्यासपीठावरून दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता अयोध्येतील आपल्या नियोजीत दौऱ्याच्या तयारीला लागेलत. येत्या २५ नोव्हेंबरला उद्धव अयोध्येचा दौरा करणार आहेत. तिथं ते भाषणाद्वारे किमान तासभर अयोध्यावासीयांसोबत संवाद साधणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

कसा असेल उद्धव यांचा दौरा?

उद्धव २४ नोव्हेंबर रोजी दुपारी विमानाने फैजाबाद विमानतळावर उतरतील. ते पहिल्यांदाच अयोध्येत पाऊल ठेवत असल्याने विमानतळावरच त्यांचं भव्य स्वागत होईल, असं म्हटलं जात आहे. त्यानंतर ते लक्ष्मण किला मैदानात जाऊन आशीर्वाद समारंभ तसंच संत पूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. पुढे सायंकाळी ते कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शरयू आरती करतील.

संतमहंतांसोबत भेटी

२५ नोव्हेंबरला उद्धव सकाळी श्रीराम जन्मभूमीवर जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतील. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी संवाद साधतील. पत्रकार परिषदेनंतर ते संतमहंत, धार्मिक-सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि स्थानिकांशी संवाद साधतील.

हिंदीची शिकवणी?

अयोध्येत उद्धव जवळपास तासभर भाषण करतील, असंही म्हटलं जात आहे. राम मंदिराच्या उभारणीवरून भाजपा सरकारला टार्गेट करण्यासाठी उद्धव यांनी चक्क हिंदीची शिकवणी लावल्याच्याही चर्चा सुरू आहेत. प्रसार माध्यमांसोबत उद्धव हिंदीत बोलतात. परंतु त्यांनी याआधी कधीही हिंदीत भाषण केलेलं नाही. त्यामुळे अयोध्यावासीयांसमोर हिंदीत भाषण करताना हे भाषण प्रभावी व्हावं, यासाठी ते विशेष काळजी घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


हेही वाचा-

राम मंदिरासाठी भाजपाला सत्तेतून खाली खेचा, उद्धव यांचा 'आरएसएस'ला सल्ला

तर, राम मंदिर उभारण्यासाठी १ हजार वर्षे लागतील- संजय राऊत


पुढील बातमी
इतर बातम्या