खातेवाटपाचा तिढा सुटला? लवकरच घोषणेची शक्यता

महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांपैकी कुठल्या पक्षाला कुठलं खातं मिळणार? हे जवळपास निश्चित झालं असून लवकरच त्यासंबंधीची घोषणा तिन्ही पक्षातील नेत्यांकडून करण्यात येईल असं म्हटलं जात आहे.

हिवाळी अधिवेशन जवळ आलं तरी महाविकास आघाडी सरकारच्या खातेवाटपाचा तिढा सुटलेला नाही. खात्यांना मंत्रीच नसल्याने अधिवेशनादरम्यान आम्ही प्रश्न विचारायचे कुणाला? असा सवाल उपस्थित करत विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली हाेती.

हेही वाचा- भाजप, शिवसेना एकत्र येणार?, मनोहर जोशींनी केलं खळबळजनक वक्तव्य

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये विविध खात्यांवरून मागील काही दिवसांपासून रस्सीखेच सुरू होती. त्यातही प्रामुख्याने अर्थ, गृह, महसूल, नगरविकास यापैकी कुठलीही दोन महत्त्वाची खाती आपल्याकडे असावी यासाठी प्रत्येक पक्ष जोर लावत होता. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यात झालेल्या बैठकीत खातेवाटपावर अंतिम चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

या खातेवाटपानुसार शिवसेनेकडे नगरविकास, उद्योग, विधी, उच्च व तंत्र शिक्षण, जलसंपदा, राज्य रस्ते विकास महामंडळ, परिवहन, सामान्य प्रशासन, सांस्कृतिक कार्य आणि मराठी भाषा अशी खाती असतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह, अर्थ, गृहनिर्माण,  सहकार, ग्रामीण विकास, वैद्यकीय शिक्षण आणि कामगार इ. खाती असतील. तसंच काँग्रेसकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम, उत्पादन शुल्क, ऊर्जा, शालेय शिक्षण, महिला आणि बालकल्याण खाती येण्याची चिन्हे आहेत. 

हेही वाचा- 'कॅब' विधेयकावरून शिवसेनेचं भांगडा पाॅलिटिक्स सुरू, ओवेसी यांची बोचरी टीका

सध्या तरी तिन्ही पक्ष या खातेवाटपावर समाधानी असून हिवाळी अधिवेशानंतरच्या मंत्रीमंडळ विस्तारात हे खातेवाटप होणार असल्याचं समजत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या