मंत्रीमंडळात ज्येष्ठ नेते हवेत, अशोक चव्हाण यांची अपेक्षा

नव्या सरकारच्या मंत्रीमंडळात ज्येष्ठ नेत्यांचा समावेश व्हायला पाहिजे, असं मत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी मांडलं आहे.

SHARE

हिवाळी अधिवेशन जवळ आलं तरी अद्याप महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. अशातच नव्या सरकारच्या मंत्रीमंडळात ज्येष्ठ नेत्यांचा समावेश व्हायला पाहिजे, असं मत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी मांडलं आहे.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांचं मिळून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आहे. या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्यासोबत तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी २ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. परंतु अद्याप खातेवाटपच झालेलं नसल्याने कुठल्याही मंत्र्याकडे एखाद्या खात्याची जबाबदारी देण्यात आलेली नाही. शिवाय इतर नेतेही आपल्याला मंत्रीपद कधी मिळणार? याच्या प्रतिक्षेत आहेत. हिवाळी अधिवेशनानंतरच मंत्रीमंडळ विस्तार होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा- अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास विरोध नाही, भुजबळांनी केला खुलासा

त्यातच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चव्हाण म्हणाले, खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्र्याचा आहे. प्रत्येक पक्षाला आपल्याकडे एक तरी महत्त्वाचं खातं असावं, असं वाटत असल्यानेच खातेवाटप रखडलं आहे. काँग्रेसमध्ये मंत्रीमंडळात काम करण्याचा चांगला अनुभव आहे. अशा नेत्यांना मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळालं पाहिजे. या मंत्र्यांच्या कामाचा सरकारला नक्कीच फायदा होईल.

काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण अशा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव असलेले दोन नेते आहेत. परंतु त्यांची वर्णी मंत्रीमंडळात लागणार की नाही, यावर प्रश्नचिन्हच आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या