काहींना आता हिंदुत्वाची पालवी फुटलीय- राऊत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या राज्यव्यापी महाअधिवेशनात गुरूवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या नव्या भगव्या झेंड्याचं अनावरण केलं. यातून मनसे हिंदुत्वाच्या वाटेवर चालणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे. त्यावर भाष्य करताना शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीच देशात प्रखर हिंदुत्वाचा विचार रुजवला आहे. काही लोकांना आता हिंदुत्वाची पालवी फुटली आहे, असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये मनसेचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या नव्या भगव्या झेंड्याचं अनावरण केलं. या झेंड्यात राजमुद्रेचा वापर करण्यात आला आहे. यावेळी व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा ठेवण्यात आल्याने मनसे हिंदुत्ववादी भूमिका घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. 

हेही वाचा- माझी स्पर्धा फक्त बाबांशीच, ‘राज’पुत्राचा काॅन्फिडन्स

शिवसेनेने भाजपसोबत काडीमोड घेऊन निर्मनिरपेक्ष विचारसणीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केल्यापासून शिवसेनेवर सातत्याने हिंदुत्ववादी विचारसरणीचा अपमान केल्याची टीका भाजपकडून होत आहे. दोन्ही काँग्रेससोबत मिळून सरकार चालवायचं असेल, तर शिवसेनेला कडव्या हिंदुत्ववादी विचारसरणीचा त्याग करावा लागेल, असं म्हटलं जात आहे. त्याचाच फायदा उचलत मनसे पक्षप्रमुख पक्षाला उभारी देण्यासाठी हिंदुत्ववादी विचारसरणी जवळ करत असल्याचं सांगितलं जात आहे. 

त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, या देशात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रखर हिंदुत्वाचा विचार रुजवला. हिंदुत्वाची ज्योत प्रखरपणे पेटविली. बाकी सगळं ठीक आहे, आता काही लोकांना पालवी फुटली आहे. फुटू द्या. पण, बाळासाहेब आणि शिवसेनेला तोड नाही. म्हणून फक्त २३ जानेवारीलाच नव्हे तर रोजच महाराष्ट्रासह देशात बाळासाहेबांचे स्मरण होत असतं.

हेही वाचा- राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करा, राजमुद्रेवरून संभाजी ब्रिगेडची पोलिसांत तक्रार

ते पुढं म्हणाले, बाळासाहेब ठाकरे कोणत्याही पदावर नव्हते. पण, जगतज्जेत्या अलेक्झांडरप्रमाणे ते वावरले. लोकांना गोळा केलं. लढण्याची प्रेरणा दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यानंतर 'हिंदूहृदयसम्राट' अशी बाळासाहेबांची ओळख आहे, असंही राऊत म्हणाले.

सोबतच महाविकास आघाडी सरकारचे १०० दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचा राऊत यांनी पुनरुच्चार केला. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीतील नेत्यांनीही अयोध्येला जावं, असा सल्लाही त्यांनी दिला.

पुढील बातमी
इतर बातम्या