Advertisement

डाॅन करीम लालाला भेटायच्या इंदिरा गांधी, संजय राऊतांनी अखेर केला खुलासा


डाॅन करीम लालाला भेटायच्या इंदिरा गांधी, संजय राऊतांनी अखेर केला खुलासा
SHARES

माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी मुंबईतील माफीया डाॅन करीम लाला याला भेटायच्या, असं वक्तव्य करून खळबळ उडवून देणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नमतं घेत आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे. काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर राऊतांनी हे पाऊल उचललं.

एका मुलाखतीच्या कार्यक्रमात मुंबईतील गुन्हेगारी विश्वाबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, ६० ते ८० च्या दशकात करीम लाला, हाजी मस्तान आणि वरदाराजन मुदलीयार या तिघांचं मुंबईतील माफीया जगतात वर्चस्व होतं. मंत्रालयात कोणाचं वर्चस्व असेल, मुंबईचा पोलीस आयुक्त कोण असेल? हे तिघेच ठरवायचे. हाजी मस्तान मंत्रालयात आल्यावर अख्खं मंत्रालय त्याच्या स्वागतासाठी हातातलं काम सोडून खाली आल्याचं मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी करीम लालाला भेटण्यासाठी पायधुनीत यायच्या.

हेही वाचा- शब्द मागे घ्या, काँग्रेस नेते राऊतांवर भडकले

एवढंच नाही, तर मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बाॅम्बस्फोटातील मुख्य आरोपी अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमला अनेकदा भेटलो, त्याच्याशी बोललोय इतकंच नाही, तर त्याला दमही दिला आहे. त्यावेळच्या तुलनेत आजचं गुन्हेगारी विश्व काहीच नाही, असंही राऊत म्हणाले होते.

या वक्तव्यावर काँग्रेस नेते संजय निरूपम, मिलिंद देवरा आणि चरण सिंह सप्रा यांनी आक्षेप घेत राऊतांनी आपलं वक्तव्य मागे घेण्याची सूचना केली होती. 

त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी सांगितलं की, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याप्रती मला नेहमीच आदर राहिलेला आहे. विरोधी पक्षात असतानाही जेव्हा केव्हा इंदिरा गांधी यांच्यावर टीका करण्यात आली, तेव्हा मी त्यांच्या बाजूने उभा राहिलोय. करीम लाला हे त्या काळी पठाणांचे नेते होते. त्यामुळे सर्वपक्षीय नेते त्यांना त्यावेळी भेटत असत. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे.

हेही वाचा- मी दाऊदला दम दिलाय- संजय राऊत

कोण होता करीम लाला?

अफगाणिस्तानमध्ये जन्मलेला करीम लाला २१ वर्षांचा असताना १९३० मध्ये पेशावरमार्गे मुंबईत आला होता. त्याचं मूळ नाव अब्दुल करीम शेर खान हे होतं. पैसे कमावण्याची ओढ असलेल्या करीम लालाने मुंबईत आल्यावर हळुहळू काळे धंदे सुरू केले. ज्यांत जुगाराचे अड्डे, दारूची दुकाने, सोने-चांदी, हिऱ्यांची तस्करी या धंद्यांचा समावेश होता. त्याच्या क्लबमध्ये मुंबईतील नामांकीत लाेकं यायची. या माध्यमातून प्रचंड पैसे कमवून त्याने मुंबईत धाक निर्माण केला होता. पठाण समुदायातील लोकं त्याच्याकडे मदत मागण्यासाठी यायचे. याच करीम लालाने एकदा दाऊद इब्राहिमला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. 


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा