Advertisement

राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करा, राजमुद्रेवरून संभाजी ब्रिगेडची पोलिसांत तक्रार

संभाजी ब्रिगेडने पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन मनसेविरूद्ध तक्रार नाेंदवली आहे. या तक्रारीत मनसेविरोधा तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करा, राजमुद्रेवरून संभाजी ब्रिगेडची पोलिसांत तक्रार
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी महाअधिवेशनात गुरूवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. हा झेंडा भगव्या रंगाचा असून त्याच्या मधोमध राजमुद्रा छापण्यात आली आहे. राजमुद्रेचा राजकीय पक्षाच्या झेंड्यात वापर करण्यास विरोध असलेल्या संभाजी ब्रिगेड या संघटनेने या नव्या झेंड्यालाही विरोध केला आहे. एवढ्यावरच न थांबता संभाजी ब्रिगेडने पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन मनसेविरूद्ध तक्रार नाेंदवली आहे. या तक्रारीत मनसेविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

मनसेच्या झेंड्यात राजमुद्रेचा वापर करण्यात येईल, असं वृत्त काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये झळकताच संभाजी ब्रिगेडने यावर आक्षेप घेतला होता. त्यापाठोपाठ मराठा क्रांती मोर्चा या संघटनेनेदेखील राजमुद्रेच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी राज्य सरकारला पत्र लिहून केली होती.

हेही वाचा- अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड  


छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही शिवरायांची प्रशासकीय मुद्रा असून याच राजमुद्रेचा वापर करून शिवरायांनी रयतेचे राज्य निर्माण केले. शिवरायांच्या लोककल्याणकारी प्रशासनाचे प्रतिनिधीत्व करणारी राजमुद्रा ही रयतेच्या राज्याचे सार्वभौमत्व सिद्ध करणारी आहे. तिचा वापर कोणत्याही राजकीय पक्षाने करणे हे चुकीचे असून प्रांत, भाषा, जात-धर्म, यावर आधारीत राजकारण करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राजमुद्रेचा वापर करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. 

त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे मनसेविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची आम्ही करत आहोत. तसेच राज ठाकरे (संस्थापक) मनसे यांनी राजमुद्रेचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाइलने आंदोलन करण्यात येईल. 

असं पत्र संतोष शिंदे, जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे, यांच्यावतीने स्वारगेट पोलिसांना देण्यात आलं आहे.

त्याआधी मराठा क्रांती मोर्चानेही (maratha kranti morcha) मनसेच्या नव्या झेंड्याचा विरोध केला आहे.

शिवरायांची राजमुद्रा हा ऐतिहासिक ठेवा आहे. त्यामुळे राजकारणासाठी त्याचा वापर होऊ नये, कुणाच्या राजकारणाविरोधात आम्ही नाही. उलट आम्ही मनसेच्या नव्या वाटचालीसाठी शुभेच्छाच देतो. परंतु केवळ राजकीय पक्षच नाही, तर कुणीही शिवमुद्रेचा वापर आपल्या स्वार्थ्यासाठी करू नये, यासाठी आम्ही न्यायालयात जाऊन शिवमुद्रेच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करू. यासंदर्भात आम्ही राज्य सरकारलाही पत्र पाठवल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी अॅड. विनोद पाटील (vinod patil) यांनी दिली. 

हेही वाचा- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याचं अनावरण

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा