माझी स्पर्धा फक्त बाबांशीच, ‘राज’पुत्राचा काॅन्फिडन्स

माझी स्पर्धा फक्त माझ्या बाबांसोबतच असेल, कारण त्यांच्या १० टक्के जरी काम करता आलं, तरी ते खूप आहे, अशा भावना अमित ठाकरे यांनी व्यक्त केल्या.

SHARE

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या महाअधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांचे चिरंजीव अमित ठाकरे (amit thackeray) यांची पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. या निवडीनंतर तुम्हाला पक्षात कुठली जबाबदारी स्वीकारायला आवडेल? इतर तरूण नेत्यांची तुलना करता तुम्ही स्वत:ला कुठं पाहता? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी केला असता माझी स्पर्धा फक्त माझ्या बाबांसोबतच असेल, कारण त्यांच्या १० टक्के जरी काम करता आलं, तरी ते खूप आहे, अशा भावना अमित ठाकरे यांनी व्यक्त केल्या. 

मनसेचं पहिलं महाअधिवेशन गोरेगाव (goregaon nesco) येथील नेस्को एक्झिबिशन ग्राऊंडवर सुरू आहे. या महाअधिवेशनाला राज्यभरातून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आले आहेत. याच अधिवेशनात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड झाल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर अमित ठाकरे यांनी व्यासपीठावर येऊन नेतेपदाचा (mns leader) स्वीकार केला. तसंच आपल्या भावना व्यक्त केल्या. या अनपेक्षित निवडीमुळे आपल्या पायाखालची वाळू सरकली. पण पक्षासाठी जोमाने काम करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. सोबत शिक्षणविषयक ठरावही त्यांनी मांडला. 

हेही वाचा- राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करा, राजमुद्रेवरून संभाजी ब्रिगेडची पोलिसांत तक्रार

मला राजकारणात अधिकृतरित्या सक्रिय व्हायचं आहे, हे कालपर्यंत ठाऊक नव्हतं. काल संध्याकाळी ५ वाजता साहेबांनी मला याची कल्पना दिली. अधिवेशनात मला शिक्षणासंदर्भात ठराव मांडायचा आहे, असं त्यांनी सांगितलं. हे ऐकून पायाखालची जमीनच सरकली. हे सगळं इतकं अचानक घडेल असं वाटलं नव्हतं. राजकारणात येण्याविषयी काही दिवस आधी सांगितलं जाईल. काही टिप्स दिल्या जातील, असं मला वाटलं होतं. पण तसं झालं नाही. अर्थात, पाण्यात पडल्यावर माणूस पोहायला शिकतोच. 

नेता म्हणून माझी निवड झाली असली तरी मला तळागाळात राहून काम करायचं आहे. पद नसतानाही मी काम करत होतोच. पडत्या काळात पक्षाला साथ देणारा तरुण वर्ग आमचा आधारस्तंभ आहे. त्यांच्यासोबत काम करायला मला आवडेल. मला कुणाशीही स्पर्धा करायची नाही. सध्या तरी माझी स्पर्धा फक्त माझ्या वडिलांशी आहे. त्यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या कामाच्या १० टक्के काम मला करता आलं तरी खूप आहे, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली.

दरम्यान आता सगळ्यांचं लक्ष राज ठाकरे आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांना काय संदेश देतील, याकडे लागलं आहे. राज ठाकरे सायंकाळी ६ वाजता भाषण करणार आहेत.

हेही वाचा- ‘अशी’ असेल मनसेची शॅडो कॅबिनेट

संबंधित विषय
ताज्या बातम्या