सदाभाऊ खोत 'कागदोपत्री' भाजपा सदस्य!

रविवारी एकीकडे 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जात होता, तर दुसरीकडे दोन मित्रांच्या विभक्त होण्यावर औपचारिक शिक्कामोर्तब होत होतं. राजकारणात असूनही मैत्री कशी जपावी, याचं आदर्श उदाहरण सादर करणारे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या मैत्रीचा रविवारी अधिकृत तुकडा पडला. सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्याच्या निर्णयावर पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं. सोमवारी या निर्णयाची औपचारिक घोषणा झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सदाभाऊ खोत यांच्यातलं रक्षासूत्र ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी तुटलं. मात्र सदाभाऊ खोत हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मानले जात असले तरीही कागदोपत्री ते भारतीय जनता पार्टीचे सदस्य झाल्याचे समोर आलं आहे. सदाभाऊ खोत हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं ठोस वृत्त मुंबई लाइव्हने दोन महिन्यांपूर्वीच दिलं होतं.  

नेमकी का  केली हकालपट्टी?

गेले अनेक दिवस सदाभाऊ खोत विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते असा वाद धुमसत होता. कधीकाळी राजकारणात जय-वीरु म्हणून वावरणाऱ्या राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात जाहीर खटके उडायला लागले होते. खोतांच्या बंडखोर वक्तव्यांवरून ते पक्षात कुणाचीही तमा बाळगत नसल्याचं स्पष्ट झालं होतं. सदाभाऊ खोत यांच्या विरोधातील तक्रारींबाबत 'स्वाभिमानी'ने पक्षांतर्गत चार सदस्यीय समिती नेमली होती. या समितीसमोर बेधडक उत्तरं देत सदाभाऊंनी अधिक रोष ओढवून घेतला. त्यातच निमित्त झालं ते एका महिलेनं खोत यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांचं. या सर्वांची परिणती खोत यांच्या हकालपट्टीतच व्हायची होती. तशी ती झाली. समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सदाभाऊंच्या हकालपट्टीची घोषणा केली.

सदाभाऊ यांच्या पक्षनिष्ठेवर शंका उपस्थित झाली आहे. शिवाय, त्यांच्यावरील आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत आहे.  राज्य मंत्रिमंडळातील सदाभाऊंची जागा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. त्यामुळे सदाभाऊंनी मंत्रिपद सोडून जागा रिकामी करावी.

दशरथ सावंत, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना चौकशी समिती

मंत्रिपदाला धक्का नाही?

सदाभाऊ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी म्हणून मंत्रिपदावर आहेत. त्यांचे पद काढून घेण्यात यावे याविषयी लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचीही माहिती सावंत यांनी दिली आहे. पण राजकारणात मुरत चाललेल्या सदाभाऊ खोतांना याबद्दल पूर्वकल्पना आली होतीच. म्हणूनच स्वाभिमानीच्या कोट्यातून मंत्रिपद मिळवूनही 'कागदोपत्री' भाजपात राहण्याची हुशारी त्यांनी दाखवली. खोतांच्या या चालीमुळे त्यांचं मंत्रिपद वाचणार असलं तरी ज्या नैतिकतेविषयी ते वारंवार बोलतात, त्या नैतिकतेचं काय? हा प्रश्न उभा राहिला आहे.  

सरकारसोबत राहण्याचा निर्णय आठवडाभरात

"सदाभाऊ यांना सत्ता सुंदरीचा स्पर्श झाल्याने हा मोह सोडवला जात नाही'', अशी जोरदार टीका स्वाभिमानी संघटनेचे प्रकाश फोफळे यांनी केली. तसेच सरकारमध्ये राहण्याच्या निर्णयाबाबतही आठवडाभरात कार्यकारिणीची बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगितले आहे.  लवकरच राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए)तून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडण्याची शक्यता आहे.

दोस्तीतील 'दरार'

सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांची मैत्री जगजाहीर. मात्र गेल्या काही दिवसांपासून 'दोस्त दोस्त ना रहा' असेच चित्र या दोघांमध्ये होते. दोघांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होते. त्यातच भाजपाने सदाभाऊ खोत यांना मंत्रिपद दिल्याने काही दिवसांमध्येच या दोघांमधील वाद आणखी विकोपाला गेले. सत्तेत सहभागी होताच सदाभाऊ संघटनेला आणि शेतकऱ्यांना विसरले, असा आरोपदेखील राजू शेट्टी यांनी केला होता. या जिगरी दोस्तांमधील दरी इतकी वाढत गेली की, वडिलांच्या आजारपणासाठी दिलेल्या उसन्या पैशाचा हिशेबही खोत यांनी जाहीरपणे चुकता केला.

पुढील बातमी
इतर बातम्या