सदाभाऊ खोत भाजपाच्या वाटेवर...

  Mumbai
  सदाभाऊ खोत भाजपाच्या वाटेवर...
  मुंबई  -  

  महाराष्ट्राचे कृषी, फलोत्पादन आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत लवकरच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका म्यानेत खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत या दोन तलवारी राहणं अवघड आहे. खोत हे भाजपात जाण्यासाठी अनुकूल आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबतीत सदाभाऊंचा संवाद झाला आहे. भाजपात जाण्याची योग्य वेळ येताच सदाभाऊ खोत पक्षांतर करतील, असा दावा सदाभाऊ खोत यांच्या मर्जीतला मानल्या जाणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका पदाधिका-याने केला आहे. दुसरीकडे गेले सदाभाऊ खोत यांनी आपल्याला मंत्रिपद मिळालं म्हणून राजू शेट्टी यांना असुया वाटते, असं बेधडक विधान करत शेट्टी यांच्याविरोधातली नाराजी व्यक्त केली आहे. बुधवारी मंत्रालयात पत्रकारांशी संवाद साधताना खोत यांनी स्वतःचा ‘स्वाभिमानी’ नूर दाखवत जणू पक्षांतराचे संकेतच दिले आहेत.

  कधीकाळी एकमेकांचे घट्ट मित्र म्हणून वावरणारे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातून गेले काही दिवस विस्तव जात नाही. शेट्टी आणि खोत यांनी एकमेकांवर टिका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. आपल्या मंत्रिपदामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्षपद हातून निसटण्याची भिती राजू शेट्टी यांना वाटत असल्याचं सांगणा-या खोत यांनी आपण टाटा, बिर्ला यांच्या नव्हे तर सामान्य शेतक-यांच्या घरात जन्म घेतल्याची आठवण खोत यांनी करून दिली आहे. शेतक-यांच्या प्रश्नांच्या मदतीने ‘हिरो’ बनण्याचा प्रयत्न राजू शेट्टी करत आहेत असा आरोपही त्यांनी केला. शेतक-यांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं सांगायलाही ते विसरले नाहीत.

  ‘वाट चुकलेला कार्यकर्ता’ असा राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांचा काही दिवसांपूर्वी उल्लेख केला होता. कुणावाचून आंदोलन अडत नाही, असा दावा करत आपण सदाभाऊ खोत यांना खिजगणतीत धरत नसल्याचं दाखवण्याचा प्रयत्नही शेट्टी यांनी केला. त्यानंतर शेट्टी-खोत जुगलबंदी झडत राहिली. खोत यांना एकदा मंत्रिपद दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना विश्वासात न घेता सदाभाऊ खोत यांना ‘सरप्राइज पॅकेज’ म्हणून अतिरिक्त खाती बहाल करण्याची खेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खेळले आणि त्यात यशस्वीही ठरले. आता त्याच मंत्रिपदाचा आधार घेऊन खोत यांनी आपल्या जुन्या मित्राच्या जखमेवरची खपली काढली आहे. सदाभाऊ खोत यांचा भाजपाकडे ओढा लपून राहिलेला नाही. आता जाहीरपणे राजू शेट्टी यांच्याविरोधात नव्यानं आगपाखड करत खोत यांनी स्वतःच्या भाजपा प्रवेशाची किलकिली दारं थोडी अधिक उघडली आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.