औरंगाबाद रेल्वे अपघात: मृत मजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची घोषणा

औरंगाबाद जवळील करमाड येथील सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन शुक्रवारी पहाटे परराज्यातील १६ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दू:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसंच जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थीत उपचार करण्याचे निर्देशही दिले.

याचसोबत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी देखील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. 

हेही वाचा - लॉकडाऊनबाबत एक्झिट प्लान काय? राज ठाकरेंचा सरकारला प्रश्न

शुक्रवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुख्य सचिव तसंच रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गेल्या ४-५ दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागातून विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येत आहे. या ट्रेनच्या माध्यमातून जवळपास १ लाख परप्रांतीय मजूर आपापल्या गावी सुखरूप पोहोचले आहेत. परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडाव्यात, यासाठी केंद्राशी सातत्याने बोलत असून येणाऱ्या काही दिवसांत राज्यात अडकलेल्या इतर मजुरांना देखील याच पद्धतीने त्यांच्या राज्यात सोडण्यात येईल. त्यामुळे कामगारांनी धीर सोडू नये. जीवावर उदार होऊन, स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करू नका, असं आवाहन परत एकदा मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

अपघातात ठार झालेले सर्व मजूर हे जालन्यातील एका खासगी कंपनीत कामाला होते. गुरूवारी रात्री जालन्याहून भुसावळला निघाले होते. भुसावळला जाऊन स्पेशल ट्रेनने ते मध्य प्रदेशात जाणार होते. तब्बल ४५ किलोमीटरचा प्रवास करून ते सर्वजण करमाड इथं पोहोचले होते. पायी चालून थकलेले हे मजूर करमाड गावाजवळील रेल्वे रूळावरच थांबले. तिथंच त्यांना झोप लागली. पहाटेच्या सुमारास जालन्याकडून आलेल्या मालगाडीचा कुठलाही अंदाज न आल्याने झोपेच्या अधीन झालेले हे १६ मजूर मालगाडीच्या खाली येऊन चिरडले गेले. यांत १६ जण जागीच ठार झाले, तर ३ जण गंभीर जखमी आहेत.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी केली लष्कराकडे ‘ही’ मागणी
पुढील बातमी
इतर बातम्या