स्थायी समिती अध्यक्षपदाच्या खुर्चीवर यशवंत जाधव बसणार!

महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी सभागृहनेते यशवंत जाधव यांची वर्णी लागली आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून यशवंत जाधव तर शिक्षण समिती अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून मंगेश सातमकर यांचं नाव जाहीर झालं आहे. याव्यतिरिक्त सुधार समिती अध्यक्षपदी मनसेतून शिवसेनेत आलेल्या दिलीप लांडे यांचं नाव निश्चित झालं आहे. 

तिघांची बिनविरोध निवड

यशवंत जाधव, मंगेश सातमकर  आणि दिलीप लांडे यांनी सोमवारी दुपारी महापालिका चिटणीस प्रकाश जेकटे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केले. पण संध्याकाळ झाली तरी काँग्रेसतर्फे कुणीही अर्ज सादर न केल्याने स्थायी समिती अध्यक्षपदी यशवंत जाधव , शिक्षण समिती अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून मंगेश सातमकर  यांची आणि सुधार समिती अध्यक्षपदी दिलीप लांडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र या निवडीच्या औपचारीक घोषणा ५ एप्रिल रोजी होणार आहे.  

महापालिका स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर आणि शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर यांचा अध्यक्ष पदाचा कालावधी संपुष्टात येत आहे. त्यामुळे या जागेसाठी ५ एप्रिल रोजी  निवडणूक होणार आहे. सभागृह नेते यशवंत जाधव यांनी आधीपासूनच स्थायी समिती अध्यक्ष पदाचा कारभार हाती घेतल्यामुळे त्यांची या पदासाठी अपेक्षित निवड झाली आहे.

म्हणून यांची वर्णी लागली

विद्यमान स्थायी समिती अध्यक्षपद रमेश कोरगावकर हे शांत स्वभावाचे असल्यानं आणि सभागृहनेते यशवंत जाधव यांच्या हस्तक्षेपामुळे कोरगावकर हे कंटाळले होते. या पदावर पुन्हा बसण्याची त्यांची मानसिकता नव्हती. त्यामुळे अपेक्षितच अशी यशवंत जाधव यांचं नाव स्थायी समिती अध्यक्षपदासाठी पक्षाने जाहीर केलं आहे.

शिक्षण समिती अध्यक्ष शुभदा गुडेकर यांनी आपल्या कारकिर्दीत उत्तमपणे शिक्षण विभागाची कमान सांभाळून अनेक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना अधिक संधी न देता त्यांच्याजागी ज्येष्ठ नगरसेवक मंगेश सातमकर यांची वर्णी लावली जात आहे.

या पदासाठी यांची नावं निश्चित

शिक्षण समिती अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून मंगेश सातमकर यांच्या नावाची घोषणा पक्षाने केली आहे. या व्यतिरिक्त सुधार समिती अध्यक्षपदी मनसेतून शिवसेनेत आलेल्या दिलीप लांडे यांचं नाव निश्चित झालं आहे. तर बेस्ट समिती अध्यक्ष पदासाठी आशिष चेंबूरकर यांचंही नाव निश्चित झालं असल्याचं पक्षाने स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा - 

सातमकर, चेंबूरकर देणार स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा

पुढील बातमी
इतर बातम्या