Advertisement

सातमकर, चेंबूरकर देणार स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा


  सातमकर, चेंबूरकर देणार स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा
SHARES

मुंबई महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेतच अंतर्गत मोठे वादळ निर्माण झाले आहे. महापालिकेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक मंगेश सातमकर आणि आशिष चेंबूरकर यांचे स्थायी समिती सदस्यत्वाचे तातडीने राजीनामे मागून घेण्यात आले आहे. हे दोन्ही सदस्य सभागृहनेते यशवंत जाधव यांचे स्पर्धक असून मातोश्रीच्या मदतीने या दोघांना या समितीतून बाहेर काढण्यात येत असल्याने जाधव यांचे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या गादीवर बसण्याचे इरादे स्पष्ट झाले आहे.


शिवसेनेत अंतर्गत धुसफूस

शिवसेनेचे मंगेश सातमकर आणि आशिष चेंबूरकर हे महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदाचे दावेदार होते. पण पक्षाने सभागृहनेतेपदी यशवंत जाधव यांची निवड केली. तर महापौरपदी विश्वनाथ महाडेश्वर यांना बसवले. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्षपदी रमेश कोरगावकर यांना बसवण्यात आल्यानंतर, या दोघांना स्थायी समिती सदस्य बनवण्यात आले होते.

स्थायी समितीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर सदस्यांच्या चिठ्ठी काढून त्यांना निवृत्त केले. पण या चिठ्ठीमध्ये मंगेश सातमकर आणि चेंबूरकर यांचं नाव निघालं नाही. त्यामुळे ते या समितीवर कायम राहणार होते. पण बुधवारी या दोघांच्या रिकाम्या लेटरहेडवर स्वाक्षरी घेऊन त्यावर त्यांचे राजीनामा पत्र लिहिण्यात आले. त्यानुसार गुरुवारी होणाऱ्या महापालिका सभेच्या कामकाजावर या दोन्ही सदस्यांचे राजीनामे मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे. यामुळे शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस उघड झाली आहे. 


म्हणून या दोघांचा पत्ता कापला

सभागृहनेते यशवंत जाधव यांना स्थायी समिती अध्यक्ष व्हायचं असून त्यासाठी त्यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे. यासाठी त्यांनी स्थायी समितीचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी आपल्या मेव्हण्यावर सोपवून त्यांना तिथे नियुक्त केलं आहे. पण स्थायी समिती अध्यक्ष बनल्यानंतर सातमकर आणि चेंबुरकर हे आपल्याला डोकेदुखी ठरतील या भीतीने या दोघांचा पत्ता कापण्यात आल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.


म्हणून राजीनामा दिला

दरम्यान मुंबई लाइव्हने सातमकर आणि चेंबूरकर यांच्याशी संपर्क साधला असता पक्षाचा आदेश असल्याने राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा